वाकड पोलिसांत गुन्हा : ‘भाई’ म्हणाला नाही म्हणून तरुणाला बेदम मारहाण
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : भाई म्हणाला नाही म्हणून एका तरुणाला बेल्टने बेदम मारहाण करुन जमिनीवरील बिस्किट खायला लावल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये घडला. या याप्रकरणी वाकड पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. यामध्ये तिन अल्पवयीन आहेत. दरम्यान, मुख्य आरोपी रोहन वाघमारे हा फरार असून या प्रकरणातील तीन जणांचे मुंडन करुन पोलिसांनी आरोपींची आज धिंड काढली.
प्रकाश इंगोले, प्रशांत आठवले, अजित उर्फ आदित्य काटे अशी धिंड काढलेल्या आरोपींची नावे आहेत. तर मुख्य आरोपी रोहन वाघमारे हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. याप्रकरणी मारहाण झालेल्या तरुणाने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
पोलिसांनी सांगितले की, पाच दिवसांपूर्वी थेरगाव येथे आरोपी रोहन याने एका तरुणाला तू मला भाई का म्हणाला नाहीस. मी या परिसरातील भाई आहे, असे म्हणून जमिनीवरील बिस्किटं खायला लावून त्याला बेल्टने इतर मित्रांच्या मदतीने मारहाण केली. यामध्ये तरुणाच्या पाठीवर मारहाणीचे व्रण देखील उमटले होते.
तर तीन आरोपींचे मुंडण करुन त्यांनी गुन्हा केलेल्या परिसरात धिंड काढली. अशा प्रकारचा गुन्हा केल्यास कठोर कारवाई केली जाईल असे म्हणत पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सज्जड दम दिला आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक संगीता गोडे यांनी केली आहे.
