युनिट-३ व सिंहगड रोड पोलिसांची कारवाई : ५९ हजार रुपये जप्त
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : सिंहगड रोड परिसरातील नऱ्हे भागात चालणाऱ्या तीन पत्ती जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा मारुन 28 जुगाऱ्यांना बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाई दरम्यान पोलिसांनी 59 हजार 650 रुपयांची रोख रक्कम जप्त केली.
ही कारवाई नऱ्हे येथील श्री कंट्रोल चौकातील वरद रेस्टो बारच्या इमारतीच्या पार्किंगमध्ये परिमंडळ-3 व सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केली.
सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी किसन चव्हाण यांनी याबाबत फिर्याद दिली. सागर कडू, प्रवीण चौधरी, अनुप चव्हाण, संकेत शिळीमकर यांच्या मदतीने तीन पत्ती जुगार सुरु असल्याने त्यांच्याही विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नऱ्हे येथील श्री कंट्रोल चौकातील वरद रेस्टो बारच्या पार्किंगमध्ये जुगाराचा अड्डा सुरु असल्याची माहिती परिमंडळ तीनच्या पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांना मिळाली. त्यानुसार रविवारी (दि.30) सायंकाळी सातच्या सुमारास छापा मारला. या कारवाईत 28 जुगाऱ्यांना अटक करुन 59 हजार 650 रुपये रोख रक्कम, तसेच जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले.
पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड, पोलीस निरीक्षक गुन्हे प्रमोद वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले, पोलीस उपनिरीक्षक कुलदिप संकपाळ, नितीन जाधव व कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे केली. पुढील तपास सिंहगड रस्ता पोलीस करीत आहेत.
