गुन्हे शाखा युनिट-१ची कारवाई : देशी बनावटीचे पिस्टल, दोन जिवंत काडतुसे केली जप्त
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : कुख्यात गुंड पप्पू तावरे खून प्रकरणात मागील आठ वर्षापासून येरवडा जेलमध्ये असलेल्या आरोपीची एक महिन्यापूर्वी निर्दोष मुक्तता करण्यात आली. जेलबाहेर आल्यानंतर स्वसंरक्षणार्थ विनापरवाना पिस्टल बाळगल्या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट-१ने अटक केली. ही कारवाई पुण्यातील धायरी येथील पासोडी परिसरात केली.
ज्ञानेश्वर उर्फ माऊली पांडुरंग तावरे (वय-31 रा. मु. जांबळी पो. सांगरुन ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पुणे ग्रामीण पोलिसांच्या हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीत 8 वर्षापूर्वी कुख्यात गुंड पप्पु तावरे याचा जांभळी गावात रुपेश तावरे, माऊली तावरे व गजा मारणे टोळीतील 7 ते 8 जणांनी मिळून टोळीच्या वर्चस्वाच्या कारणावरुन गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करुन खून केला होता. या गुन्ह्यात सर्व आरोपींना अटक झाली होती. त्यामध्ये सर्वजण जामिनावर बाहेर आले होते. मात्र माऊली तावरे याला जामीन मिळाला नव्हता.
एक महिन्यापूर्वी आरोपींना निर्दोष सोडल्याने येरवडा जेलमध्ये असलेल्या माऊली तावरे याला देखील सोडण्यात आले होते. माऊली तावरे याने तुरुंगातून बाहेर आल्यानंतर विरोधी टोळीकडून जिवाला धोका असल्याच्या भितीने पिस्टल बाळगले असून तो धायरी परिसरात फिरत असल्याची माहिती पोलीस अंमलदार दत्ता सोनवणे यांना सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पथकाने धायरी येथील एका मोकळ्या जागेत आरोपीला सापळा रचून ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता 62 हजार रुपये किंमतीचे देशी बनावटीचे पिस्टल मिळाले. तसेच मॅगझीनमध्ये दोन जिवंत काडतुसे मिळाली.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे, पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, सुनिल कुलकर्णी, पोलीस अंमलदार दत्ता सोनवणे, अनिकेत बाबर, राहुल मखरे, अशोक माने, शशिकांत दरेकर, विजयसिंग वसावे, रुक्साना नदाफ यांच्या पथकाने केली.
