दत्तवाडी पोलिसांत फिर्याद : जनता वसाहतीमधील वाघजाई मंदिर परिसरात घडली घटना
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून पाठलाग करून कोयता फेकून मारणाऱ्या चार हल्लेखोरांवर दत्तवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. जनता वसाहतीमधील वाघजाई मंदिर परिसरात ४ फेब्रुवारी २०२२ रोजी सायंकाळी सहा ते साडेसहाच्या दरम्यान ही घटना घडली.
सौरभ सरवदे (वय २२, रा. जनता वसाहत, पुणे) यांनी दत्तवाडी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार अज्ञात हल्लेखोरांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी मित्रासह सहकारनगर येथील डोंगरावरून जनता वसाहत येथे घरी जात होते. त्यावेळी आरोपींनी फिर्यादीला दारू पिण्यासाठी एक हजार रुपये मागितले. मात्र, फिर्यादीने पैसे न देता त्यांच्या तावडीतून पळ काढला. त्यावेळी हल्लेखोरांनी पाठलाग करत कोयता फेकून मारून खून करण्याचा प्रयत्न केला. तसेच रस्त्यावर उभ्या असलेल्या मुलांना शिवीगाळ करीत मारण्याची धमकी दिली. दत्तवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद खरात पुढील तपास करीत आहेत.














