सायबर पोलिसांची कारवाई : एजंट जीवन सानपसाठी उमेदवारांकडून गोळा करीत होता पैसे
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : आरोग्य विभागाच्या ‘गट क’चा पेपर फुटीप्रकरणात सायबर पोलिसांनी एका पोल्टी व्यावसायिकाला अटक केली आहे.
अतुल प्रभाकर राख (वय ३०, रा. बीड) असे त्याचे नाव आहे.
पोलिसांनी सांगितले की, जीवन सानप हा आरोग्य विभागाच्या पेपर फुटीमध्ये एजंट म्हणून काम करत होता. त्याच्या दोन भावांना अटक करण्यात आली आहे. मात्र, जीवन सानप हा फरार आहे. अतुल राख हा पोल्ट्री व्यावसायिक असून, जीवनचा मेव्हणा आहे.
तो आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठीच्या उमेदवारांकडून पैसे गोळा करुन ते जीवनकडे देत होता. त्याच्याकडून पोलिसांनी मोबाईल जप्त केला आहे. अतुल राख याच्या मदतीने जीवन सानप याचा शोध घ्यायचा आहे. त्याने किती उमेदवारांकडून पैसे गोळा केले, याचा तपास करायचा असून त्यासाठी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.















