कोंढवा पोलिसांत गुन्हा : उंड्री चौकातील मेडिकल दुकानात झाली चोरी
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : पिस्टलसदृश हत्याराचा धाक दाखवून साडेपाच हजार रुपये चोरणाऱ्या दोन चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे. उंड्री चौकातील श्री स्वामी समर्थ मेडिकल शॉपमध्ये ९ फेब्रुवारी २०२२ रोजी पहाटे पावणेतीनच्या सुमारास ही घटना घडली.
उमेश यादव (वय २९, रा. हांडेवाडी रस्ता, पुणे) यांनी कोंढवा पोलिसांत फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी उंड्री चौकातील श्री स्वामी समर्थ मेडिकल शॉपमध्ये काम करीत होते. त्यावेळी मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी पिस्टल सदृश हत्याराच्या धाकाने साडेपाच हजार रुपये रोख चोरून नेले. कोंढवा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक वैभव सोनवणे पुढील तपास करीत आहेत.















