दत्तवाडी पोलिसांची कारवाई : सराईत गुंडाची जनता वसाहतीत दहशत ?
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : रस्त्याने जाणार्या तरुणांनी दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने गुंडाच्या टोळक्याने कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच रस्त्याच्या कडेला थांबलेल्या मुलांना जीवे मारण्याची धमकी देऊन दहशत माजवणाऱ्यांना दत्तवाडी पोलिसांनी अटक केली.
केट्या ऊर्फ अमित थोपटे (वय ३०), सुरज प्रभाकर झिंटे (वय ३०) असे अटक केलेल्या रेकॉर्डवरील गुडांची नावे आहेत. त्याचे साथीदार अमोल थोपटे व गणेश मोडावत यांच्यावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सौरभ दत्तु सरवदे (वय २२, रा. जनता वसाहत) याने दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी सांगितले की, सौरभ सरवदे व त्याचा मित्र अनिस ऊर्फ मुन्ना सय्यद हे ४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता जनता वसाहत येथील वाघजाई मंदिराच्या परिसरातून पायी जात होते. त्यावेळी केट्या याने त्यांना अडविले. त्यांच्याकडे दारु पिण्यासाठी १ हजार रुपये मागितले. फिर्यादी पैसे न देता पळून जाऊ लागले. तेव्हा आरोपींनी त्यांचा पाठलाग करुन कोयते फेकून मारुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच रस्त्याच्या कडेला थांबलेली मुले यांना मारण्याची धमकी देऊन शिवीगाळ करुन दहशत निर्माण केल्याने मुले पळून गेली. आरोपींच्या दहशतीमुळे त्यांनी आजवर फिर्याद दिली नव्हती. शेवटी बुधवारी त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन दोघा गुंडांना अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक खरात तपास करीत आहेत.
