सिंहगड रोड पोलिसांत फिर्याद : रिलेशनची माहिती आईवडिलांना सांगण्याची भीती दाखवत लुबाडले
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : अल्पवयीन मुलीसोबत जवळीक साधून तिच्याशी मैत्री केली. त्यानंतर आपल्या रिलेशनची माहिती घरी सांगेल, अशी भीती दाखवून तिच्या प्रेमीने ब्लॅकमेल करुन लुबाडले. त्यानंतर आणखी एका तरुणाने हे तुमचे रिलेशन तुझ्या आईवडिलांना सांगण्याची धमकी देऊन या मुलीला त्यानेही लुबाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार जून २०१९ पासून आतापर्यंत सुरु होता.
याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी ऋतीक दिघे (वय १९, रा. दत्तनगर, कात्रज) याला अटक केली आहे. सार्थक नावाच्या तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी आनंदनगर येथे राहणार्या एका १७ वर्षाच्या मुलीच्या आईने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी सांगितले की, आनंदनगर येथील एका १७ वर्षाच्या मुलीसोबत ऋतीक दिघे याने जवळीक साधून मैत्री केली. त्यानंतर तिला भावनिक ब्लॅकमेल केले. त्या दोघांचे रिलेशन घरी सांगेल, अशी धमकी देऊन तिच्याकडे तो वेळोवेळी पैसे मागू लागला. तिच्याकडून त्याने आतापर्यंत ७ हजार ५०० रुपये लुबाडले.
त्यानंतर त्याने डिसेंबर २०२१ मध्ये तिला खडकवासला येथे घेऊन गेला. तेथे तिच्या गालावर, हातावर किस करुन तिचा विनयभंग केला. या दोघांच्या रिलेशनची माहिती सार्थक याला मिळाली. तेव्हा त्याने या मुलीला तू रिलेशनमध्ये ये, नाही तर ऋतीक व तुझे संबंधाबाबत तुझ्या आईवडिलांना सांगेल, अशी धमकी दिली. तिच्याकडे पैशाची मागणी करुन ५०० रुपये घेतले. आपल्या मुलीला वारंवार अधिक पैशाची गरज का भासते, याची चौकशी केल्यावर या मुलीने आपल्या आईला हा सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली असून पोलीस उपनिरीक्षक शिंदे तपास करीत आहेत.
