भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई : ४० हजार रुपयांचे दोन कॅमेरे केले जप्त
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : कॅमेरा भाड्याने देणाऱ्या दुकानदारांचा विश्वास संपादन करुन कॅमेरा भाड्याने घेऊन त्याची विक्री करणाऱ्या आरोपीला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीकडून 40 हजार रुपये किमतीचे दोन कॅनॉन 200 डी (Canon 200D) कॅमेरे जप्त केले आहेत. ही कारवाई पुण्यातील नऱ्हे येथे करण्यात आली.
लक्ष्मण नामदेव सांगळे (वय-19 रा. सध्या नऱ्हेगाव, भुमकर पेट्रोल पंपासमोर, सिंहगड रोड, मुळ रा. शिव पार्वती नगर, ठाकरे चौक, पंढरपुर जि. सोलापूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी गगन विजयकुमार जाधव (वय-19 रा. दिव्यस्पुर्ती सोसायटी, दत्तनगर, आंबेगाव खुर्द) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादीचा कॅमेरे भाड्याने देण्याचा व्यवसाय आहे. आरोपीने 9 फेब्रुवारी रोजी दुपारी दोनच्या सुमारास फिर्यादी यांच्याकडून 40 हजार रुपये किमतीचे दोन कॅनॉन 200 डी कॅमेरे भाड्याने घेतले. मात्र ते परत न करता त्याचा अपहार केला. गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेत असताना तपास पथकातील पोलीस अंमलदार हर्षल शिंदे, धनाजी धोत्रे व सचिन गाडे यांना गुन्ह्यातील आरोपी पुणे शहरातील विविध ठिकाणाहून कॅमेरे भाड्याने घेत असून, तो नऱ्हे येथे राहात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीला राहत्या घरातून ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीकडून गुन्ह्यातील दोन कॅमेरे जप्त केले आहेत. तसेच अशा प्रकारची कोणाची फसवणूक झाली असेल तर त्यांनी पोलिसांकडे संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
पोलीस उपायुक्त परिमंडळ-2 सागर पाटील, सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर,
पोलीस निरीक्षक गुन्हे संगिता यादव, पोलीस निरीक्षक विजय पुराणिक यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक वैभव गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे, पोलीस अंमलदार रविंद्र चिप्पा, गणेश भोसले, सचिन पवार,
हर्षल शिंदे, आकाश फासगे, गणेश शेंडे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, विक्रम सावंत, आशिष गायकवाड, अवधुत जमदाडे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
