मार्केटयार्ड पोलिसांची कारवाई : घरफोडीतील हत्यारे, सोन्या-चांदीचे दागिने केले जप्त
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : घरफोडीच्या प्रयत्नातील आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर आणि सोसायटीच्या वॉचमनवर दगड, विटा आणि कोयता फेकून मारणाऱ्या तीन आरोपींना मार्केटयार्ड पोलिसांनी शिताफिने अटक केली. ही कारवाई पर्वती येथील जनता वसाहत कालव्यावर करण्यात आली. आरोपीकडून हत्यारे लोखंडी कटर, स्क्रु ड्रायव्हर, लोखंडी पाना, टॉमी तसेच 30 हजार रुपये किमतीचे सोन्या–चांदीचे दागीने जप्त केले.
नवलसिंग अजम अलावा (वय 40), भाया भांगु देवका (वय 32). विनोद रमेश सिसोदिया (वय 19) तिघे रा. नरवाली, तहसील कुकशी, जि. धार राज्य मध्यप्रदेश अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
आरोपींना पकडण्यासाठी पोलीस दिवस – रात्र त्यांच्यावर पाळत ठेवून होते. दरम्यान आरोपी हे जनता वसाहत येथील कॅनॉलवर आल्याचे दिसून आले. पोलिसांनी आरोपींचा पाठलाग करुन त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून घरफोडी करण्यासाठी वापरलेली हत्यारे लोखंडी कटर, स्क्रु ड्रायव्हर, लोखंडी पाना, टॉमी तसेच 30 हजार रुपये किमतीचे सोन्या–चांदीचे दागीने जप्त केले.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग नामदेव चव्हाण यांच्या सूचनेनुसार पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनघा देशपांडे, पोलीस निरीक्षक गुन्हे सविता ढमढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस अंमलदार हिरवाळे, किरण जाधव, महेश जाधव, आशिष यादव, स्वप्नील कदम, संदीप सुर्यवंशी, लोणकर, गायकवाड, शेख, घुले यांच्या पथकाने ही दमदार कामगिरी केली.
