लोणीकंद पोलिसांत फिर्याद : पुणे अंमली पदार्थ विरोधी पथक-२ची कारवाई
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : अंमली पदार्थ विरोधी पथक-२च्या पोलिसांनी 4 लाख 35 हजार रुपये किमतीच्या गांज्यासह एकाला अटक केली आहे. त्यांच्याकडून 21 किलो 675 ग्रॅम गांजा जप्त केला. ही कारवाई पुण्यातील कोलवडी (केसनंद) गावातील गायकवाड वस्ती येथे केली.
आंबु दशरथ पवार (वय ४०, रा. मु.पो. अंतरवाली, ता. भुम, जि. उस्मानाबाद, सध्या रा. कोलवडी, गायकवाड वस्ती, ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपींवर लोणीकंद पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. ॲक्ट (NDPS Act) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक चेतन दिलीप गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे.
अंमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस निरीक्षक प्रकाश खांडेकर व पोलीस अंमलदार हे लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलींग करत होते. त्यावेळी कोलवडी गावातील गायकवाड वस्ती येथे एका व्यक्तीकडे गांजा असून तो गांजाची वाहतूक करीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पथकाने परिसरात सापळा रचून एका सिल्वहर रंगाच्या ज्युपीटर (एमएच 14 जेडब्ल्यू 3828) गाडीवर एक नायलॉन पोते घेऊन येताना आंबु पवार दिसला. त्याची झडती घेतली असता 4 लाख 35 हजार रुपये किमतीचा 21 किलो 675 ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ आढळून आला. आरोपीकडून गांजा आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण 4 लाख 85 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -2 नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक प्रकाश खांडेकर, पोलीस उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण, पोलीस अंमलदार संतोष देशपांडे, प्रशांत बोमादंडी, मयुर सुर्यवंशी, चेतन गायकवाड, संतोष जाचक, संदिप शेळके, साहिल शेख, आझीम शेख, योगेश मांढरे, महिला अंमलदार दिशा खेवलकर यांच्या पथकाने ही दमदार कामगिरी केली.

 
			


















