कोंढवा पोलिसांची कारवाई : पन्नास हजारांचा मुद्देमाल जप्त
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : गावठी पिस्टल विकण्यासाठी आलेल्या दोघांना जेरबंद करण्यात कोंढवा पोलिसांना यश मिळासे असून, एक पिस्टल आणि चार काडतुसे असा एकूण पन्नास हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
शुक्रवारी, ८ ऑक्टोबर रोजी पोलीस आयुक्त पुणे शहर यांच्या आदेशाप्रमाणे पुणे शहरात ऑल आउट कोम्बींग ऑपरेशन राबविण्यात आले होते. त्याप्रमाणे कोंढवा पोलीस ठाणे हद्दीतही वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) जगन्नाथ जानकर यांच्या सूचनांप्रमाणे तपासपथक अधिकारी पोलीस उपनिरीक्षक पी. यू. कापुरे, पोलीस अंमलदार योगेश कुंभार, अमोल हिरवे, महेश राठोड, गणेश चिंचकर, दीपक जडे, अभिजित रत्नपारखी, जयदेव भोसले, तुषार आल्हाट असे ऑल आउट कोम्बिंग ऑपरेशन करत असताना पोलीस अंमलदार गणेश चिंचकर, योगेश कुंभार यांना बातमीदारामार्फतीने बातमी मिळाली की, कान्हा हॉटेलच्या चौकातील पी.एम.टी. बस स्टॉपच्या जवळ थांबलेल्या एका इसमाच्या कमरेला पिस्टल बाळगलेला असून, तो पिस्टल विक्री करण्यासाठी आलेला आहे.
मिळालेल्या बातमीप्रमाणे कोंढवा पोलीस ठाणेकडील तपासपथक सदर ठिकाणी ट्रॅप लावून थांबले असता, सदर इसम त्यांना दिसला.तो दुसऱ्या एका इसमासोबत जाऊ लागताच त्यांना ताब्यात घेण्यात आले.
स्वप्निल प्रदीप जगताप (वय २२, रा. मु. पो. सुलतानपुर कमानीखाली, ता. वाई, जि. सातारा) आणि अमन इस्माईल सय्यद (वय २१, रा. सय्यदनगर, महंमदवाडी, पुणे, मूळ रा. मु.पो. बोपर्डी ता. वाई जि. सातारा) अशी त्यांची नावे असून, त्यांच्या अंगझडतीत ५०,००० रुपयांचे एक देशी बनावटीचे पिस्टल, ४०० रुपये किमतीची ४ जिवंत काडतुसे मिळाली. ती जप्त करण्यात आली. आरोपीकडे अग्निशस्त्राबाबत विचारपूस केली असता त्याने ते विक्री करण्यासाठी आणले असल्याचे सांगितले. त्यांच्या विरुद्ध कोंढवा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून, आरोपीस अटक करण्यात आलेली आहे. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता ११ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.
सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठाच्या मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे हे करीत आहेत.















