चाकण पोलिसांत गुन्हा : महावितरणच्या दोघा अधिकार्यांरसह चौघांवर गुन्हा दाखल
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : महावितरणच्या दोघा अधिकाऱ्यांनीच कंत्राटदार कंपनीच्या मालकांशी संगनमत करुन तब्बल १८ लाखाहून अधिक युनिटचे बिल आकारणी केली नाही, तसेच साडेतीन लाख रुपयांची नवीन वीज मिटरचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार निघोज (ता. खेड) येथील तिरुपती इंजिनिअरिंग कंपनीमध्ये घडला आहे.
याप्रकरणी महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी हरिहर जगतसिंग गोठवाड (वय ५२, रा. ससाणेनगर, हडपसर) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चाकण उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता राहुल अशोक डेरे, सहायक अभियंता शरद विश्वासराव जगदाळे, सिक्युअर एजन्सी/कंपनीचे पदाधिकारी आणि तिरुपती इंजिनिअरिंग कंपनी व प्रतिनिधी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले की, राहुल डेरे व शरद जगदाळे हे महावितरणचे पदाधिकारी आहे. त्यांनी कंपनीच्या वतीने ग्राहकांना मिटर बसविण्याचे काम दिलेल्या सिक्युअर एजन्सीचे पदाधिकारी यांच्या सोबत आणि निघोज गावातील तिरुपती इंजिनिअरिंग कंपनीचे मालक व पदाधिकारी यांच्या संगनमत केले. तिरुपती इंजिनिअरिंग कंपनीत २ लाख १९ हजार ५२४ विद्युत युनिट पुरविले. मात्र, त्याचे १८ लाख २७ हजार ३२० रुपयांचे बिल न आकारता महावितरण कंपनीची फसवणूक करुन शासनाचा महसुल बुडविला.
सिक्युअर एजन्सी या कंपनीला महावितरणने ग्राहकांना पुरविण्यासाठी नवीन २३ मिटर सोपविले होते. ३ लाख ३४ हजार ४०० रुपयांच्या या मिटरची माहिती महावितरणला न देता त्या मिटरचा अपहार केला आहे. पोलीस उपनिरीक्षक गायकवाड अधिक तपास करीत आहेत.
















