आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई : संचालक संभाजी काटकर, चंद्रकांत कुलकर्णी आणि युवराज भंडारी अटकेत
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : सिंहगड रस्त्यावर असणाऱ्या झील एज्युकेशन सोसायटीच्या तीन संचालकांना आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे. बनावट स्टाफ दाखवून झील संस्थेने शासनाची फसवणूक करुन 4 कोटी 25 लाख 29 हजार 482 रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपींनी इंजिनिअरींग कॉलेज, एम.बी.ए. कॉलेज, एम.सी.ए कॉलेज या शैक्षणिक संस्थांमध्ये मागील अनेक वर्षापासून अशा प्रकराची फसवणूक केली असल्याची माहिती पोलिसांच्या तपासामध्ये समोर येत आहे.
संभाजी मारुती काटकर (वय-65 रा. राजमहल, हिंगणे खुर्द, सिंहगड रोड पुणे), चंद्रकांत नारायण कुलकर्णी (वय-58 रा. अशोका आगम, दत्तनगर, कात्रज), युवराज विठ्ठल भंडारी (वय-35 रा. जांभूळवाडी रोड, आंबेगाव खुर्द, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. योगेश सुभाष ढगे यांनी झील शिक्षण संस्थेच्या विरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीचा समांतर तपास करत असताना हा प्रकार उघडकीस आला आहे.
आरोपींनी संगनमत करुन झिल पॉलिटेक्निक कॉलेजचा फी मंजूरीसाठी शासनाकडे पाठविण्यात आलेल्या प्रस्तावात बनावट स्टाफ (माजी विद्यार्थी व स्टाफचे नातेवाईक) नोकरीवर नसताना ते नोकरी करत असल्याचे दाखवले. त्यांना पगार दिल्याचे दाखवून त्याप्रमाणे खोटी पगार पत्रके तयार करुन ती फी मंजूरीसाठी शुल्क निर्धारण समिती मुंबई यांना सादर केली. खर्चाची रक्कम जादा झाल्याचे दाखवून त्या आधारे शिक्षण शुल्क समिती कडून फी मंजूर करुन घेतली. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून जास्त फीची आकारणी करुन विद्यार्थ्यांचे पालक व शासनाची फसवणूक केली.
आतापर्य़ंतच्या तपासात झिल एज्युकेशन सोसायटीच्या अंतर्गत असलेल्या झिल पॉलिटेक्नीक पुणे या कॉलेजने 2015-16 या शैक्षणिक वर्षात अशा प्रकारे विद्यार्थ्यांचे पालक व शासनाकडून वाढीव फी घेऊन तब्बल 4 कोटी 25 लाख 29 हजार 482 रुपये एवढ्या रक्कमेचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. झिल एज्युकेशन सोसायटीच्या अंतर्गत असलेल्या इंजिनिअरींग कॉलेज, एम.बी.ए. कॉलेज, एम.सी.ए. कॉलेजमध्येही अनेक वर्ष अशा प्रकारे आर्थिक गैरव्यवहार केलेला आहे. त्याबाबत देखील पोलिस तपास करीत आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
या गुन्ह्याचा तपास पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके, सहायक पोलीस आयुक्त विजयकुमार पळसुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दत्तात्रय भापकर करीत आहेत.