भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद : प्रमोद दोडके विरूध्द गुन्हा दाखल
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : आपण मुळ जागा मालक असून सोसायटीमध्ये आपल्या वाट्याला येणारे फ्लॅट विकत देण्यापोटी कोट्यवधी रुपये घेऊन एकाने चौघांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार जुलै २०१८ पासून आंबेगाव येथील तारा वेस्ट ब्रुक फिल्ड सोसायटीतील फ्लॅटबाबत घडला आहे.
याप्रकरणी चेतन आनंद पांड्याजी (वय ३४, रा. कात्रज) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी प्रमोद विश्वनाथ दोडके (वय ५४, रा. अमित ब्लूम फिल्म, आंबेगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, प्रमोद दोडके याने आपण तारा वेस्ट ब्रुक फिल्ड सोसायटीच्या मुळ जागेचे जागा मालक आहोत. या सोसायटीमध्ये ज्यांचे वाट्याला येणारे फ्लॅटपैकी फ्लॅट क्रमांक बी ४०१ हा फ्लॅट विकत देतो, असे फिर्यादी यांना दोडके यांनी सांगितले. त्याबदल्यात त्यांच्याकडून २५ लाख रुपये घेतले. प्रत्यक्षात त्यांना फ्लॅट न देता त्यांनी दिलेली रक्कमही परत केली नाही. त्यांच्या प्रमाणेच आरती एकनाथ फिरंगे, अनिता जयंत खाडीलकर व आंनद करपे यांचीही अशाच प्रकारे आर्थिक फसवणूक केली.
पोलीस उपनिरीक्षक थोरात अधिक तपास करीत आहेत.