कोंढव्यात गगन एमिरल्ड सोसायटीमधील प्रकार उघड
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : शहरात पार्किंगची समस्या दिवसेंदिवस वाढत असून लोकांकडे एकापेक्षा अधिक गाड्या झाल्याने आता मोठमोठ्या सोसायटीमध्येही पार्किंगवरुन वाद वाढू लागले आहेत. कोंढव्यातील गगन एमिरल्ड सोसायटीत पार्किंगच्या जागेवर अतिक्रमण केल्याने एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 1 सप्टेंबर 2020 ते 27 जानेवारी 2022 दरम्यान घडला.
याप्रकरणी हमजा मोहम्मद हुसेन आगा (वय 35, रा. गगन एमिरल्ड सोसायटी, कोंढवा) यांनी कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी इरफान मुलाणी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
कोंढवा पोलिसांनी सांगितले की, हमजा आगा यांनी गगन एमिरल्ड या सोसायटीत फ्लॅट घेतला. फ्लॅट खरेदी करताना बिल्डरने त्यांना पार्किंग स्लट नं. 58 हा दिला आहे. सोसायटीतील सदस्य इरफान मुलाणी यांना पार्किंगचा स्लॉट नं. 55 दिला आहे. असे असताना त्यांनी बिल्डरसोबत असलेल्या रागातून आगा यांना त्यांच्या पार्किंगचा वापर करता येणार नाही अशा रितीने त्यांची पार्किंगची जागा अडवून त्यांच्या पार्किंगच्या जागेत चारचाकी गाडी पार्क केली.
दरम्यान, त्यांना अनेकदा विनंती केल्यानंतरही मुलाणी यांनी पार्किंगवर अतिक्रमण चालू ठेवले. त्यानंतर आता त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली असून पोलिसांनी अतिक्रमण केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास कोंढवा पोलीस करीत आहे.