खडक पोलिसांची कामगिरी : पुण्यातील एच. पी ज्वेलर्समध्ये झाली होती चोरी
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : गणेश पेठेतील एच.पी. ज्वेलर्स दुकानातील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या महिलेला खडक पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी तिच्याकडून 1 लाख 75 हजार रुपये किमतीच्या 5 सोन्याच्या अंगठ्या जप्त केल्या. आरोपी महिलेला अंबेगाव बुद्रुक येथील राहत्या घरातून अटक केली. ही घटना 26 जानेवारीला उघडकीस आली होती.
याप्रकरणी एच.पी ज्वेलर्सच्या मालकीन भूमिक राजेश सोनी यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी महिलेला अटक केली आहे.
पोलिसांनी सांगितले की, आरोपी महिला फिर्यादी यांच्या दुकानात अंगठ्यांच्या काउंटरला दीड महिन्यापासून काम करत होती. 25 जानेवारी रोजी रात्री सव्वा सातच्या सुमारास आरोपी महिलेने काउंटरवरील अंगठ्यांची व रक्कमेबाबत माहिती कॉम्प्युटरमध्ये भरुन निघून गेली. दुसऱ्यादिवशी सोनी यांनी अंगठ्यांचा स्टॉक तपासला असता त्यामध्ये 1 लाख 75 हजार रुपये किमतीच्या 35.5 ग्रॅम वजनाच्या 5 अंगठ्या कमी असल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांनी दुकानातील सीसीटीव्ही तपासले असता आरोपी महिला अंगठ्या चोरत असल्याचे दिसून आले. सोनी यांनी खडक पोलीस ठाण्यात आरोपी महिलेविरुद्ध फिर्याद दिली.
खडक पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे पोलीस महिलेचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार रवी लोखंडे व संदिप तळेकर यांना एच.पी. ज्वेलर्स दुकानात अंगठ्या चोरणारी महिला आंबेगाव बुद्रुक येथील भैरवनाथ मंदिराजवळ राहत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी आरोपी महिलेला तिच्या राहत्या घरातून ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशी दरम्यान तिने घरात लपवून ठेवलेल्या 5 अंगठ्या पोलिसांना दिल्या. ही महिला यापूर्वी आणखी कोणत्या दुकानात कामाला होती का, तीने अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत का? याचा तपास पोलीस करीत आहेत.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, अतिरिक्त कार्यभार पोलीस उपायुक्त विवेक पाटील, सहायक पोलीस आयुक्त सतिश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट, पोलीस निरीक्षक गुन्हे हर्षवर्धन गाडे, पोलीस उपनिरीक्षक राहुल खंडाळे, शंकर कुंभारे, पोलीस अंमलदार अजीज बेग, संदिप पाटील, संदीप तळेकर, रवी लोखंडे, विशाल जाधव, राहुल मोरे, हिंमत होळकर, सागर घाडगे, नितीन जाधव, प्रवीण गव्हाणे, किरण शितोळे, महेश पवार यांच्या पथकाने ही कामगिरी केली.