विश्रामबाग पोलिसांत फिर्याद : शनिवार पेठेतील राहत्या घरी घडली घटना
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : आईला माऊलीपासून अनेक उपमा दिल्या जातात. मात्र, याच आईवर आता छोट्या छोट्या कारणावरुन हात उचलण्याचे धक्कादायक प्रकार समोर येऊ लागले आहेत. कबतुर घरात का घेऊन आला, असे विचारल्याने एका तडीपारी संपल्याने घरी आलेल्या गुन्हेगाराने आपल्या ५५ वर्षाच्या आईला उलथण्याने व झाडूने मारहाण केली. सासूला सोडविण्यासाठी आलेल्या सुनेलाही त्याने मारहाण केली. ही घटना रविवारी सकाळी साडेअकरा वाजता राहत्या घरात घडली.
जय राजेश भोसले (रा. साई कॉम्प्लेक्स, शनिवार पेठ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी त्याची आई उर्मिला राजेश भोसले (वय ५५) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी सांगितले की, जय भोसले याला फरासखाना पोलिसांनी तडीपार केले होते. सुमारे १५ दिवसांपूर्वी त्याची तडीपारीची मुदत संपल्याने तो शनिवार पेठेतील घरी येऊन राहु लागला. जय भोसले हा रविवारी सकाळी कबुतर घरात घेऊन आला होता. तेव्हा कबुतर घाण करतात, त्याला घरी का आणले असे त्याच्या आईने त्याला विचारले. त्यावरुन त्याने आईबरोबर वाद घातला. वाद वाढल्याने त्याने आपल्या आईला स्वयंपाक घरातील उलथण्याने मारले. तसेच घरातील झाडु घेऊन मारहाण करुन लागला. हे पाहून जय याची पत्नी आपल्या सासूला सोडविण्यासाठी मध्ये पडली. तेव्हा त्याने तिलाही हाताने मारहाण केली. आपल्याच मुलाने आपल्यावर हात उचलल्याने शेवटी आईने पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी त्याला अटक केली असून हवालदार गणेश भुजबळ अधिक तपास करीत आहेत.