सांगवी पोलिसांची कारवाई : पिंपळे सौदागर येथे घडला धक्कादायक प्रकार
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : तडीपार आदेशाचे उल्लंघन करुन शहरात वावरणाऱ्या सराईत गुन्हेगाराने पोलिसांना कोयत्याचा धाक दाखवून धक्काबुक्की केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना पिंपळे सौदागर येथे पहाटे सव्वा चारच्या सुमारास घडली. सांगवी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
सलीम पापा शेख (वय-36 रा. फ्लॅट नं.8, अशोका पार्क सोसायटी, काटे पेट्रोल पंपासमोर, पिंपळे सौदागर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
याप्रकरणी पोलिस नाईक श्याम रमणलाल साळुंके यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी सांगितले की, आरोपी सलीम शेख हा सराईत गुन्हेगार असून त्याला पिंपरी-चिंचवड शहर, पुणे शहर व पुणे जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. परंतु त्या आदेशाचे उल्लंघन करुन पोलिसांची कोणतीही परवानगी न घेता तो पिंपळे सौदागर परिसरात वावरत होता.
सांगवी पोलीस ठाण्यातील पोलीस कारवाई करण्यासाठी गेले. त्यावेळी आरोपीने फिर्यादी साळुंके यांना धक्का मारुन निघून जाऊ लागला. त्यामुळे पोलिसांच्या पथकाने त्याला अटकाव केला असता आरोपीने कमरेला खोचलेला कोयता बाहेर काढून पोलिसांना धमकावून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक काळू गवारी करीत आहेत.















