आयएमएफ आंतरराष्ट्रीय संस्थेचे शिक्कामोर्तब
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्था जोमाने पुढे जात आहे. यावर्षी जूनमध्ये देशात महागाईने कळस गाठल्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेसह अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांनी भारताचा जीडीपी दर कमी असेल असा अंदाज वर्तवला होता. पण जुलै-सप्टेंबर 2023-24 या दुसऱ्या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेने 7.6 टक्क्यांची झेप घेतली आणि अनेकांचे अंदाज बदलले. भारतीय अर्थव्यवस्था जागतिक स्तरावर दमदार कामगिरी बजावत आहे.
देशांतर्गतच नाहीतर जागतिक स्तरावरील अनेक संस्थांना त्यांनी चकमा दिला आहे. भारतीय अर्थव्यवस्था चालू आर्थिक वर्षात 6.3 टक्के दराने प्रगती करेल असा विश्वास आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने वर्तवला आहे. सोमवारी याविषयीचा अंदाज वर्तवण्यात आला. डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर आणि मजबूत प्रशासकीय धोरणामुळे विकासाचा दर गाठण्यात अडचण येणार नसल्याचे जागतिक संस्थेचे म्हणणे आहे. पण हा अंदाज पण मागे पडेल, असा व्होरा अर्थतज्ज्ञांचा आहे. यापूर्वी भारतीय रिझर्व्ह बँकेचा अंदाज ही चुकला होता. गेल्या तिमाहीत अर्थव्यवस्थेने दमदार कामगिरी केल्याचे आकडेवारीने समोर आणले आहे.
यावर्षी जूनपासून महागाईने डोके वर काढले आहे. नोव्हेंबरची महागाईची आकडेवारी पण भीतीदायक आहे. पण या काळातही भारतीय अर्थव्यवस्थेची घौडदौड कायम आहे. जुलै-सप्टेंबर 2023-24 या दुसऱ्या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेने 7.6 टक्क्यांची झेप घेतली. या आर्थिक वर्षातील ही सर्वात दमदार कामगिरी ठरली आहे. सकल देशातंर्गत उत्पादनाची (GDP) आकडेवारी सांख्यिकी विभागाने समोर आणली होती. या आकडेवारींनी अनेक अर्थतज्ज्ञ आणि जागतिक संस्थांना जोरदार धक्का दिला होता.
आयएमएफचा सूर आणि नूर पालटला
आतंरराष्ट्रीय नाणेनिधीने यापूर्वी भारतीय अर्थव्यवस्था मोठ्या जोमाने पुढे जाण्याविषयी साशंकता व्यक्त केली होती. सध्याच्या घौडदौडीविषयीचा अंदाज ही त्यांनी मोठा वर्तवलेला नाही. पण भारतीय अर्थव्यवस्था चालू आर्थिक वर्षात 6.3 टक्के दरापेक्षा अधिकचा वेग गाठण्याची शक्यता आयएमएफने वर्तवली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत तितकी क्षमता असल्याचे संस्थेचे म्हणणे आहे. भारतीय कुशल, अकुशल मनुष्यबळाचा अर्थव्यवस्थेचा गाडा लोटण्यात मोठा वाटा असल्याचे आयएमएफने म्हटले आहे.
रिझर्व्ह बँकेचा अंदाज काय
भारतीय रिझर्व्ह बँकेने दुसऱ्या तिमाहीतील प्रगतीविषयीचा अंदाज जोखला होता. त्यानुसार भारतीय अर्थव्यवस्था दुसऱ्या तिमाहीत 6.5 टक्क्यांचा टप्पा गाठण्याचा दावा केला होता. दुसऱ्या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेने 7.6 टक्क्यांची झेप घेतली. आता 31 मार्च 2024 रोजीपर्यंत भारतीय अर्थव्यवस्था चालू आर्थिक वर्षात 7 टक्के दराने विकास करेल, असा विश्वास आरबीआयने व्यक्त केला आहे.