वारजे पोलीसांची कारवाई
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : टोळीप्रमुख अविनाश उर्फ आव्या गंपले व त्याच्या इतर ३ साथीदारावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. वारजे पोलीसांनी ही कारवाई केली.
अविनाश गंपले ऊर्फ आव्या (वय १९ वर्षे, रा. सर्वेनं ४५/२ महादेव मंदिराजवळ, अमरभारत सोसायटी, वारजे माळवाडी) सतीश राठोड, ऊर्फ सत्यपाल (वय १८ वर्षे, रा. विठ्ठलनगर पाण्याचे टाकीजवळ वारजे माळवाडी), विशाल सोनकर, (वय १९ वर्षे, रा विद्याविहार सोसायटी दांगट पाटील नगर, शिवणे वारजे माळवाडी) व एक विधीसंघर्षित बालक यांना अटक करण्यात आली. त्यांना पोलीस कस्टडी देण्यात आली तसेच १ विधिसंघर्षित बालकास बाल न्यायालयात हजर करण्यात आले.
सदगुरु किराणा स्टोअर जवळ, अमरभारत सोसायटी, वारजे माळवाडी या ठिकाणी फिर्यादी व त्याच्या मित्राला रस्त्यामध्ये अडविण्यात आले. हातांमधील लोखंडी हत्यार व लाकडी बांबूचा धाक दाखवून फिर्यादीच्या कमरेवर व पायावर मारहाण करण्यात आली. शिवीगाळ व धमकी देवून फिर्यादीच्या पॅटच्या खिशातील रोख रक्कम रुपये ७०० जबरदस्तीने काढून घेण्यात आले. तसेच या ठिकाणी दहशत निर्माण केली त्यामुळे लोक घाबरून पळून गेले. फिर्यादी यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाणे येथे येऊन फिर्याद दिल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला.
दाखल गुन्ह्यांच्या तपासादरम्यान आरोपी अविनाश गंपले ऊर्फ आव्या याने आपल्या अधिपत्याखाली प्रत्येक गुन्हयात काही सामाईक व काही नवीन साथीदार यांना सोबत घेऊन स्वतःची संघटीत टोळी तयार केली. यातील आरोपी यांनी जबरी चोरी करणे, जबरी चोरी करताना इच्छापूर्वक दुखापत करणे, अविचाराने दुस-यांच्या जिवीतास किंवा व्यक्तीगत सुरक्षिततेस धोका निर्माण करणे, इच्छापूर्वक दुखापत करणे, नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान करुन तोडफोड करणे, बेकायदेशीर शस्त्र जवळ बाळगणे, पोलीसांच्या आदेशाचा भंग करणे, सर्वसामान्य नागरिकांच्या मनात दहशत निर्माण करणे यासारखे गंभीर गुन्हे वारंवार केले आहेत. यातील आरोपी यांनी संघटित दहशतीच्या मार्गाने स्वतःच्या आर्थिक फायद्या करीता गुन्हा केल्याचे दिसुन आले आहे. त्यांच्या वर्तनात सुधारणा होत नसल्याचे लक्षात आले आहे. गुन्हयाचा पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त, कोथरूड विभाग भिमराव टेले हे करीत आहेत.
ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा, रामनाथ पोकळ अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील, पोलीस उपआयुक्त परि-३ सुहेल शर्मा, यांच्या मार्गदर्शनाखाली वारजे माळवाडी पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल जैतापुरकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय कुलकर्णी, सहायक पोलीस निरीक्षक अमोल ओलेकर, पोलीस उपनिरीक्षक तृप्ती पाटील, निगराणी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विशाल मिंडे, पोलीस अंमलदार संभाजी दराडे, विजय खिलारी, नितीन कातुर्डे, ज्ञानेश्वर गुजर, रामदास गोणते यांनी केली आहे.
मोक्का अंतर्गत केलेली ही १०३ वी कारवाई आहे.
