महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : राज्यातील कारागृहात सन २०२४-२५ मध्ये विविध प्रकारचे ३५,००० झाडे लावण्यात येणार आहेत. जागतीक वाढते तापमान व प्रदूषणाच्या पार्श्वभुमीवर सर्व घटकांनी पृथ्वीच्या पर्यावरणाचा समतोल राखण्याची गरज निर्माण झालेली आहे व ही जबाबदारी ओळखून महाराष्ट्र कारागृह विभाग देखील यासाठी सज्ज झालेला आहे.
त्यासाठी, सन २०२४-२५ या वर्षामध्ये महाराष्ट्रातील कारागृहात वृक्ष लागवड कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत राज्यातील विविध कारागृहात एकुण वेगवेगळ्या प्रकारच्या जातीची ३५,३६२ वृक्ष लागवडीचे उदीष्टे ठेऊन निसर्गाला हिरवा शालू घालण्याचे स्वप्न महाराष्ट्र कारागृहाने साकार करण्याचे ठरविले आहे.
या अभियानाला राज्यभरामध्ये सामाजिक वनीकरण विभाग, पोलीस विभाग, सामाजिक संस्था, कृषी विद्यापीठ, वन विभाग, भारत पेट्रोलियम यांचे सहकार्य लाभणार आहे. सध्या राज्यात 31 कारागृहामध्ये शेती केली जात आहे. कारागृह विभागाकडे शेतीसाठी एकूण ५८६.३१ हेक्टर क्षेत्र उपलब्ध आहे.
त्यापैकी ३२०.२२ हेक्टर क्षेत्र वहिवाटीखाली असून १७१.११ हेक्टर क्षेत्र वनीकरणासाठी वापरण्यात येत आहे. पावसाळा संपण्यापूर्वी वृक्ष लागवड पूर्ण करण्याचा मानस आहे. पावसाळ्यात वृक्षाची लागवड केल्यास त्याचे संरक्षण आणि संवर्धन होणे सोपे जाते.
आंबा, चिंच, जांभूळ, आवळा, सिताफळ यासारखे फळझाडे, शेवगा कढीपत्ता यासारखे भाजीपाला पिके तसेच साग, शिसम, पिंपळ, कापूर, कडूलिंब यासारख्या रोपांचा समावेश आहे. सदर वृक्ष लागवड कार्यक्रम राधिका रस्तोगी, प्रधान सचिव (गृह विभाग), महाराष्ट्र राज्य यांच्या संकल्पनेतून करण्यात येत आहे.
प्रशांत बुरडे, अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या प्रेरणेतून आणि डॉ. जालिंदर सुपेकर, विशेष पोलीस महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा, यांच्या मार्गदर्शनाखाली या वृक्षांचे संवर्धन व संरक्षण करण्याची जबाबदारी महाराष्ट्र कारागृह विभागाने घेतली आहे.