बी.एम.सी.सी. कॉलेजच्या विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती प्रदान
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : मी बी.एम.सी.सी. कॉलेजचा माजी विद्यार्थी असून इथे आल्यावर खूप छान वाटते. नवीन उद्योजक तयार करण्यासाठी शिक्षण घेत असतानाच व्यवसायात यश संपादन करणाऱ्यांना प्रेरणा देण्यासाठी पारितोषीक वितरण सोहळ्यांच्या माध्यमातून सन्मान देण्याचे काम चेंबरकडून होत आहे हे खरोखरच कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन जेष्ठ उद्योगपती विठ्ठलशेठ मणियार यांनी केले.
चेंबरच्या माध्यमातून शिक्षणासोबत व्यवसायात ही यश मिळविलेल्या बी. एम. सी. सी. कॉलेजच्या विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती प्रदान कार्यक्रम मंगळवार दि. १३ ऑगस्ट रोजी बी.एम.सी.सी. कॉलेजच्या टाटा हॉल, पुणे येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते.
जेष्ठ उद्योगपती विठ्ठलशेठ मणियार कार्यक्रमाचे अध्यक्ष व विद्या सहकारी बँकेचे अध्यक्ष, विद्याधर अनास्कर प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते.नवीन व्यवसाय उद्योग सुरु करणाऱ्या विद्यार्थ्यासाठी पैसे कमी पडू नये यासाठी विद्या सहकारी बँक, दि पूना मर्चेंटस् चेंबर व पुणे जिल्हा बँकेच्या माध्यमातून काहीतरी ठोस योजना होतकरु विद्यार्थ्याना सहाय्य होईल यासाठी करु, अशी माहिती विद्याधर अनास्कर यांनी आपल्या मनोगतात दिली.
चेंबरच्या अमृत महोत्सवी वर्षात खासदार शरद पवार च्या सुचनेनुसार बी.एम.सी.सी.च्या विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती प्रदान करण्यासाठी चेंबरने फंड निर्माण केला असून यासाठी शरद पवार, विठ्ठलशेठ मणियार व गोयल परिवार तसेच इतरांचाही आर्थिक सहयोग मिळाला आहे.
या उपक्रमाचे हे दुसरे वर्ष आहे. कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना व्यवसाय सुरु करुन यश संपादन केलेल्या १० विद्यार्थ्याना प्रत्येकी रु. २५,०००/- शिष्यवृत्ती व सर्टिफिकेट प्रदान करुन गौरविण्यात आले. तसेच कॉलेजच्या ३ प्राध्यापकांनाही त्यांच्या यशस्वी कार्याबद्दल गौरविण्यात आले.
या प्रसंगी बी.एम.सी.सी. कॉलेजचे प्राचार्य डॉ. कुचेकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अरुण निम्हण यांनी मनोगत व्यक्त केले. चेंबरची माहिती माजी अध्यक्ष राजेंद्र बाठिया यांनी दिली तर शिष्यवृत्तीबद्दल चेंबरचे अध्यक्ष रायकुमार नहार यांनी माहिती दिली.
तसेच डॉ. राजश्री गोखले यांनी उपस्थितांचे आभार मानले व डॉ. आस्मा बागवान यांनी सुत्रसंचालन केले. कार्यक्रमा दरम्यान गोयल परिवाराचा सन्मान करण्यत आला. स्व. रघुवीरसिंग गोयल यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या प्रसंगी गोयल परिवाराने सदर उपक्रमाच्या फंडात पाच लाख रुपये देगणी देण्याचे जाहिर केले.
कार्यक्रमास चेंबरचे उपाध्यक्ष अजित बोरा, सचिव ईश्वर नहार, सहसचिव आशिष दुगड, माजी अध्यक्ष राजेंद्र बाठिया, प्रवीण चोरबेले व कार्यकारीणी सदस्य नवीन गोयल, संदिप शहा, संकेत खिवंसरा तसेच माजी प्राध्यापक डॉ. संजय कंदलगांवकर, व्ही.ए.जोशी, सुहास पटवर्धन व माजी प्राध्यापक भोंडे तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक तसेच कॉलेजचा प्राध्यापक वर्ग आदी मान्यवर उपस्थित होते.