वर्धमान प्रतिष्ठान मध्ये चातुर्मासानिमित्त प्रवचनमालेतून मार्गदर्शन
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : सत्कर्माचे छोटे बीज महत्वाचे आहे त्याचा व्यापक विश्वव्यापी विस्तार होऊ शकतो असे प्रतिपादन पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी यांनी केले.
वर्धमान प्रतिष्ठानच्या वतीने चातुर्मासानिमित्त आयोजित केलेल्या प्रवचन मालेमध्ये त्यांनी उपस्थित भाविकांना मार्गदर्शन केले. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प. पु. साध्वी श्री शिलापीजी यांनीही मार्गदर्शन केले .
प. पु. आचार्य श्री चंदनाजी म्हणाल्या, आयुष्यात आपले जे काही चुकले ते आपल्याला सुधारावे असे वाटत असते. स्मृती आणि ज्ञान यांच्या मदतीने आपण भूतकाळात जाऊ शकतो. भूतकाळाप्रमाणेच आपल्याला भविष्यकाळ ही सुंदर बनवायचा असतो. सामायिक ही जीवनाची प्राथमिक साधना आहे.
शुभ आणि अशुभ असे दोन कशाय आपल्या जीवनावर प्रभाव टाकत असतात. शुभ भावाचे एक बीज टाकले तर त्यातून चांगुलपणाचा विस्तार होत जातो. आपले शब्द आणि भाव वलयाच्या रूपाने सर्व ब्रम्हांडापर्यंत पोहोचतात. त्याचप्रमाणे शुभ भाव सुद्धा सर्व ब्रम्हांडापर्यंत पोहोचतो.
एकेका गावामध्ये चांगले काम विरायतांच्या माध्यमातून कसे उभे राहिले याची माहिती देताना प. पु. आचार्य श्री चंदनाजी म्हणाल्या, जगतपुर नावाच्या एका गावामध्ये एकट्याने राहणाऱ्या मुलीला मी विचारले की तुला एकट्याने राहायला भीती वाटत नाही का? त्यावर ती मुलगी म्हणाली होती, मला भीती वाटत नाही कारण माझ्यासोबत ईश्वर असतो.
त्या मुलीचे तेच विचार ऐकून त्या मुलीला मी आपल्या सोबत घेतले. माझ्या समवेत असणाऱ्या एका परिवाराने तिला दत्तक घेतले आणि तिची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली. आज त्या मुलीचे लग्न झाले असून ती एका संपन्न सुखी परिवारामध्ये राहते आहे. छोट्याशा चांगला कामाचे जे बीज रुजले तेव्हापासून त्या गावांमध्ये चांगले काम उभे राहत गेले.
त्यातून अनेकांना चांगले काम करण्याची प्रेरणा मिळाली. विरायतनच्या माध्यमातून अशाच चांगल्या कामाचा विस्तार होत गेला आहे. सत्कर्माचे एक बीज खूप मोठ्या कार्याची क्षमता राखून असते. त्याचा व्यापक विश्वव्यापी विस्तार होऊ शकतो.
