चंदन नगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : पुण्यात एका तरुणीचा निर्घृण खून केल्याचे उघडकीस आले आहे. खराडीतील मुळा-मुठा नदीपात्रात एका सुमारे ३० वर्षांच्या तरुणीचा मृतदेह आढळला असून, तरुणीचे हातपाय आणि शीर धडावेगळे करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
खून झालेल्या तरुणीची ओळख अद्याप पटलेली नाही. खराडी परिसरात नदीपात्रालगत एका इमारतीचे काम सुरू आहे. तेथील बांधकाम मजुरांनी सोमवारी (ता. २६) सकाळी नदीपात्रात एका तरुणीचा मृतदेह वाहून आल्याचे पाहिले. त्यांनी त्वरित या घटनेची माहिती पोलिसांना दिली.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तरुणीची ओळख पटू नये म्हणून शीर धडावेगळे करण्यात आले आहे.पोलिसांनी मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला असून अहवाल अद्याप मिळालेला नाही. तरुणीचे वय अंदाजे १८ ते ३० वर्षे असल्याची माहिती चंदननगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय चव्हाण यांनी दिली.
मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणातून नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जात आहे. तरुणीचा खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह पाण्यात टाकून देण्यात आला आहे. मृत तरुणीची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.
खून करणाऱ्या आरोपीचा शोध सुरू असून, याप्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिलेल्या माहितीनुसार खून दोन दिवस आधीच (शनिवारी) झालेला असल्याचा अंदाज आहे.
मृतदेहाचे ससून रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले आहे. ओळख पटविण्यासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील बेपत्तांच्या तक्रारींचा शोध घेतला जात आहे. तसेच, पोलीस आरोपीच्या मागावर आहेत. पोलीस निरीक्षक अनिल माने तपास करीत आहेत.
