ढोल-ताश्याच्या गजरात नवरात्र उत्सवास प्रारंभ
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : पुणे येथील माँ आशापुरा माता मंदिर ट्रस्टच्या वतीने गंगाधाम चौकाजवळील माँ आशापुरा मंदिरात आयोजित केलेल्या नवरात्र उत्सवाचा शुभारंभ झाला. ढोल-ताश्याच्या गजरात, विधिवत पूजा करून आशापुरात माता मंदिरात घटस्थापना करण्यात आली.
पहिल्याच दिवशी भाविकांनी मोठ्या संख्येने येत आशापुरा माताचा आशिर्वाद घेतला. विविधरंगी फुलांच्या सजावटीने मंदिर सजविण्यात आले आहे. नवरात्र उत्सवामुळे मातेच्या मूर्तीची सुंदर सजावट केली आहे.
नवरात्र उत्सवाच्या या नऊ दिवसांमध्ये अभिषेक, आरती, नवचंडी महायज्ञ, माता की चौकी, भजन, श्री सुक्त पठण, कन्यापूजन, नवदुर्गा सन्मान पुरस्कार सोहळा, श्री देवी सूक्तम् मंत्र सामूहिक पठण, आदी धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.
यावेळी फ्लॅश मॉबचे आयोजन देखील करण्यात आले आहे. तसेच नवरात्र उत्सवामध्ये सकाळी ६.३० वाजता आरती होणार असून ७ ते ९ च्या दरम्यान अभिषेक होणार आहेत. नवचंडी महायज्ञ दुपारी ४ ते सायंकाळी ७ पर्यंत होणार आहे.
सायंकाळी ७ वाजता महाआरती होणार असून त्यानंतर देवीचे भजन, देवीच्या गाण्यांचा कार्यक्रम माता की चौकी होणार आहे. तसेच, विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजवलेल्या कर्तृत्ववान महिलांना नवदुर्गा सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच, कन्यापूजन करण्यात येणार आहे. महिला सशक्तीकरण विषयी चर्चासत्राचे आयोजन देखील करण्यात आले आहे, अशी माहिती अध्यक्ष विजय भंडारी यांनी दिली.
माँ आशापुरा ही राजस्थानमधील अनेकांची कुलदेवता आहे. महाराष्ट्रात आशापुरा मातेचे मंदिर नसल्याने पुणे आणि परिसराबरोबरच महाराष्ट्रात स्थायिक झालेल्या परंतु, मूळच्या राजस्थानमधील लोकांना लग्न कार्यानंतर अथवा इतर धार्मिक कार्यक्रमासाठी राजस्थानमध्ये जावे लागत असे.
नागरिकांना इथेच आशापुरा मातेचे दर्शन घेता यावे म्हणून विजय भंडारी आणि परिवाराने गंगाधाम चौकाजवळ माँ आशापुरा मातेचे भव्य मंदिर बांधले. याठिकाणी होत असलेला नवरात्र उत्सवदेखील खूप वेगळ्या स्वरुपाचा आणि समाजाला दिशा देणारा आहे. त्यामुळे भाविक मोठ्या प्रमाणात याठिकाणी दर्शनासाठी येतात.
सेवा हे व्रत; नवरात्रीमध्ये त्याला विशेष महत्त्व
भारतीय संस्कृतीमध्ये सेवेला विशेष महत्त्व आहे. खासकरून नवरात्र उत्सवामध्ये केलेल्या सेवेला विशेष स्थान आहे. यामुळेच आशापूरा माता मंदिर ट्रस्ट आणि लायन्स क्लब ऑफ पुणे गणेशखिंडच्या वतीने सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. नवरात्र उत्सवात माता-भगिनींचा सन्मान करण्याची संधी आपल्याला मिळते. या अनुषंगाने विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या कर्तृत्वान महिलांना नवदुर्गा सन्मान पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. आपण या नवरात्र उत्सवात माता-भगिनींचा सन्मान करण्यासाठी आणि आशापुरा मातेचा आशिर्वाद घेण्यासाठी आवर्जून या.
विजय भंडारी अध्यक्ष, माँ आशापुरा माता मंदिर ट्रस्ट