महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : शहरातील नामांकित बांधकाम व्यावसायिक न्याती बिल्डर यांनी दांडेकर पूल येथील आंबील ओढा झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाच्या ठिकाणी अनधिकृत गौण खनिज उत्खनन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे पुणे शहर तहसीलदार सूर्यकांत येवले यांनी 13 कोटी 27 लाख 19 हजार 74 रुपयांचा दंड ठोठावला आहे.
या प्रकरणी स्थानिक कार्यकर्ते प्रदीप भगवान अवघडे आणि कसबा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर यांनी तक्रार दाखल केली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दांडेकर पूल येथील आंबील ओढा झोपडपट्टी स. नं. 135 फायनल प्लॉट 28 येथे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या वतीने पुनर्वसनाचे काम सुरू आहे.
हे काम सुरुवातीला केदार असोसिएट्स यांच्याकडे होते. मात्र, सदर फर्म काळ्या यादीत गेल्याने काम केदार व्हेंचर्स यांना देण्यात आले. केदार व्हेंचर्स यांनी नामांकित न्याती बिल्डर यांच्यासोबत 70-30 असा विकास करार केला.
या प्रकल्पात अनेक त्रुटी आढळल्या असून, न्याती बिल्डर यांनी झोपडपट्टीवासीयांची घरे न बांधता विक्रीसाठीचे बांधकाम सुरू केले. त्यांनी त्या बांधकामाची जाहिरातही सुरू केली. दरम्यान, न्याती बिल्डर यांनी पाया खोदण्यासाठी 20 मे 2024 रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडून दहा हजार ब्रास खोदकामाची परवानगी घेतली, ज्यासाठी 69 लाख 11 हजार 145 रुपये जमा केले.
परंतु, त्यांनी परवानगीपेक्षा जास्त प्रमाणात खोदकाम केले. याबाबत अवघडे आणि आमदार धंगेकर यांनी तक्रार दाखल केली. 9 ऑक्टोबर रोजी प्रत्यक्ष जागेवर तपासणी करण्यात आली, ज्यात 18,293.463 ब्रास अधिक उत्खनन केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे न्याती बिल्डर यांच्यावर दंड ठोठावण्यात आला आहे.


 
			



















