महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समितीचा निर्णय
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : सद्यस्थितीत बाजार फीची आकारणी हा ग्राहकांवर विनाकारण भुर्दंड आहे तसेच पारंपारिक व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना मारक ठरत आहे. अन्नधान्य व खाद्यान्न वस्तूंवर जीएसटी लागू झाल्यानंतर शासनाने ‘एक देश, एक कर’ या संकल्पनेप्रमाणे बाजार फी रद्द करणे आवश्यक होते. परंतु, अद्यापही सदर कराची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यामुळे बाजार फी आकारू नये, अशी मागणी महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समितीच्या बैठकीत करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समितीच्या वतीने रविवार, दि. २० ऑक्टोबर रोजी सकाळी पूना मर्चंटस् चेंबर, पुणे येथे महाराष्ट्रातील सर्व व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींची राज्यव्यापी परिषद आयोजित करण्यात आली.
या परिषदेसाठी महाराष्ट्रातील मुंबई, नवी मुंबई, नाशिक, नागपूर, बारामती, अहमदनगर, बार्शी, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, कराड, सातारा, पंढरपूर, जळगाव, धुळे, उल्हासनगर इ. ठिकाणांहून व्यापारी संघटनांचे प्रत्यक्ष ७५ पदाधिकारी तसेच ऑनलाइन माध्यमातून १०० हून अधिक विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
२ तास सविस्तर चर्चा झाल्यानंतर, सध्याच्या परिस्थितीत ‘सेस नकोच’ ही मागणी कायम ठेवण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे, तुर्तास काही दिवस शासनाकडून कोणताही निर्णय होणे शक्य नाही.
त्यामुळे बाजार समिती कायद्यातील विविध अडचणी व बाजार फीच्या अनुषंगाने एक निवेदन तयार करण्यात आले. सद्यस्थितीत बाजार फीची आकारणी हा ग्राहकांवर विनाकारण भुर्दंड आहे तसेच पारंपारिक व्यावसायिकांना मारक ठरत आहे.
अन्नधान्य व खाद्यान्न वस्तूंवर जीएसटी लागू झाल्यानंतर शासनाने ‘एक देश, एक कर’ या संकल्पनेप्रमाणे बाजार फी रद्द करणे आवश्यक होते. परंतु, अद्यापही सदर कराची अंमलबजावणी केली जात आहे.
या संदर्भात एक सविस्तर निवेदन तयार करून येणाऱ्या निवडणुकीत महाराष्ट्रातील विधानसभेचे सर्व उमेदवार तसेच राजकीय पक्षांच्या नेत्यांना देण्याचे ठरले. यामुळे पुढील विधानसभेत निवडून येणाऱ्या राज्यातील २८८ आमदारांना या प्रश्नांचे गांभीर्य लक्षात येईल व त्या माध्यमातून सध्याच्या परिस्थितीत व्यापार वाढण्यासाठी सेस रद्द करण्याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता निर्माण होईल.
या परिषदेस महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी, फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (मुंबई) चे अध्यक्ष जितेंद्र शहा, चेंबर ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्रीज अँड ट्रेडचे मोहनभाई गुरनानी, द ग्रेन, राईस अँड ऑइल सीड्स मर्चंट्स असोसिएशन (मुंबई) चे अध्यक्ष भीमजीभाई भानुशाली, पूना मर्चंटस् चेंबरचे अध्यक्ष राय कुमार नहार, माजी अध्यक्ष राजेंद्र बाठिया, राजेश शहा व प्रविण चोरबेले, सांगली चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अमरसिंह देसाई, शरदभाई शहा, सोलापूरचे सुरेश चिक्कळी, राजू राठी, मंदारनाथ स्वामी, सिद्धाराम उमदी, कोल्हापूरचे श्रीनिवास मिठारी, विवेक शेटे, लातूरचे पाडुरंग मुंदडा, अमरावतीचे विनोद कलंत्री, पंढरपूरचे गांधी आदी पदाधिकाऱ्यांनी आपली मते मांडली.
या प्रसंगी सचिव ईश्वर नहार, सहसचिव आशिष दुगड, दिनेश मेहता, उत्तम बातिया, आशिष नहार, नवीन गोयल, सुहास दोशी, संकेत खिवंसरा, सतीश आगरवाल, जवाहरलाल बोधरा उपस्थित होते, अशी माहिती महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समितीचे समन्वयक राजेंद्र बाठिया यांनी दिली.