साठेनगरमधील तरवडे वस्तीत दहशत माजविण्याचा प्रयत्न
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : हडपसर परिसरातील साठेनगर येथील तरवडे वस्तीत दहशत माजविण्यासाठी पिस्तुलं बाळगणाऱ्या दोघा सराईत गुंडांकडून काळेपडळ पोलिसांनी २ गावठी पिस्तुलं व ४ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.
अटक केलेल्यांची नावे रितेश बाबासाहेब कसबे (रा. तरवडे वस्ती, साठेनगर, हडपसर) आणि राहुल संजय चौधरी (रा. साठेनगर, हडपसर) अशी आहेत.
काळेपडळ पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक अमित शेटे हे त्यांच्या सहकाऱ्यांसह गस्त घालत होते. यावेळी पोलीस हवालदार दाऊद सय्यद आणि अतुल पंधरकर यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील गुन्हेगार रितेश कसबे आणि त्याचा मित्र राहुल चौधरी हे देसाई हॉस्पिटलच्या मागे पाण्याच्या टाकीजवळ थांबले असून त्यांच्याकडे अग्निशस्त्र असण्याची शक्यता आहे.
या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांना पाहून ते दोघे कावरंबावर झाले. पोलिसांनी दोघांनाही घेरून ताब्यात घेतले. रितेश कसबे याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला एक पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे सापडली. राहुल चौधरीकडून देखील एक पिस्तुल, दोन काडतुसे आणि मोबाईल जप्त करण्यात आला.
पिस्तुलं का बाळगली याबाबत विचारले असता, त्यांनी साठेनगरमधील तरवडे वस्तीत दहशत माजविण्यासाठी ती बाळगल्याचे सांगितले. त्यांच्याकडून २ पिस्तुलं, ४ जिवंत काडतुसे आणि मोबाईल असा एकूण ९० हजार ८०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस उपायुक्त आर. राजा, सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या सूचनेनुसार सहायक पोलीस निरीक्षक अमित शेटे, पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, पोलीस हवालदार दाऊद सय्यद, अमोल काटकर, परशुराम पिसे, पोलीस अंमलदार श्रीकृष्ण खोकले, सद्दाम तांबोळी, महादेव शिंदे, अतुल पंधरकर आणि सूर्यवंशी यांच्या पथकाने पार पाडली.