विश्रांतवाडीमधील चंद्रकांत टिंगरे जखमी
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : माजी नगरसेविका रेखा टिंगरे यांचे पती चंद्रकांत टिंगरे यांच्यावर दगडफेक करुन त्यांना जबर जखमी करण्याची घटना मंगळवारी दुपारी घडली.
या घटनेत चंद्रकांत टिंगरे हे जबर जखमी झाले असून त्यांच्यावर विमल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत. रेखा टिंगरे व चंद्रकांत टिंगरे यांनी गेल्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार बापूसाहेब पठारे यांना पाठिंबा दिला आहे.
ही घटना मंगळवारी दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास विश्रांतवाडी परिसरातील धानोरी जकातनाका येथील एमएसईबी कार्यालयसमोर घडली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रकांत टिंगरे व त्यांचा कारचालक सचिन गायकवाड हे आंबेडकर सभागृहात जात होते.
वाटेत त्यांनी एमएसईबी कार्यालयासमोर आपली गाडी थांबविली. टिंगरे हे कारमधून खाली उतरले. त्याचवेळी दुचाकीवरुन तीन ते चार जण आले. त्यांनी तोंडाला फडके बांधले होते. त्यांनी विटा आणि सिमेंटचे गट्टु टिंगरे यांच्या दिशेने फेकून मारले. त्यात टिंगरे यांच्या डोक्याला, छातीला, तोंडावर त्याचा मार लागला.
डोक्याला लागलेल्या दगडामुळे ते रक्तबंबाळ झाले. कारचालकाने तातडीने त्यांना हॉस्पिटलमध्ये नेले. या दगडफेकीत गाडीचा काचा फोडल्या. या घटनेची माहिती मिळताच उमेदवार बापूसाहेब पठारे, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस उपायुक्त हिंमत जाधव व अन्य पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन माहिती घेतली.