१० वर्षानंतर लागला निकाल : तीन प्रत्यक्षदर्शी साक्षीदार ठरले महत्वाचे
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : टोळी युद्धातून कुख्यात गुन्हेगार प्रकाश चव्हाण याचा गोळ्या झाडून खून केल्याप्रकरणी न्यायालयाने सहा आरोपींना जन्मठेप व प्रत्येकी १३ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एस. वाघमारे यांनी हा निकाल दिला.
तब्बल दहा वर्षांनी या खटल्याचा निकाल लागला आहे. या आरोपींकडून तीन पिस्तुले व तीन कोयते जप्त करण्यात आले होते. तीन प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि बॉलिस्टिक एक्स्पर्टचा रिपोर्ट महत्वाचा ठरला. दिलीप कांबळे, अनिल सपकाळ, अमर शेवाळे, अमोल शिंदे, प्रकाशसिंग बायस आणि श्याम जगताप अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत.
प्रकाश चव्हाण हे महाराष्ट्र राज्य श्रमिक माथाडी ट्रान्सपोर्ट व सुरक्षारक्षक आणि जनरल कामगार युनियनचे अध्यक्ष होते. प्रकाश चव्हाण याची स्वत:ची गुन्हेगारी टोळी होती. त्याची निगडी परिसरात दहशत होती. या टोळीची दहशत मोडून काढण्यासाठी आरोपींनी संगनमत करुन प्रकाश चव्हाण यांच्यावर पाळत ठेवली होती.
प्रकाश चव्हाण हे १० डिसेंबर २०१४ रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास पुर्णानगर येथील एका सलूनमध्ये गेले होते. तेथून बाहेर पडल्यावर दबा धरुन बसलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. तसेच धारदार शस्त्राने त्याच्यावर सपासप वार केले. जखमी अवस्थेतील प्रकाश चव्हाण याला रुग्णालयात नेण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यु झाला.
या खटल्यात सरकारी वकील मारुती वाडेकर यांनी २२ साक्षीदार तपासले. या गुन्ह्यातील फिर्यादी जखमी झाले होते. डॉक्टरांनी त्यांच्या दंडातून गोळी बाहेर काढली. त्यांच्यासह प्रत्यक्षदर्शी तिघा साक्षीदारांची साक्ष महत्वाची ठरली.
तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय नाईक पाटील, पोलीस निरीक्षक आर. बी. उंडे, गुन्हे निरीक्षक बिलाल शेख, तसेच कोर्ट पैरवी पोलीस उपनिरीक्षक गोविंद मरभळ, हवालदार अनिल जगताप यांनी काम पाहिले.