सोलापूर गुन्हे शाखेची यशस्वी कारवाई : १४.३९ लाखांचा मुद्देमाल जप्त
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
सोलापूर – पवन श्रीश्रीमाळ : सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकाने आंतरजिल्हा गुन्हेगाराकडून दोन घरफोड्यांचे गुन्हे उघडकीस आणत एकूण १४.३९ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दि. १५ फेब्रुवारी २०२५ रोजी, सुरेखा विठ्ठल तोडकरी (वय ५२, व्यवसाय: शिक्षिका, रा. चाटला चौक, जोडभावी पेठ, सोलापूर) यांच्या तिसऱ्या मजल्यावरील घराचे दिवसा कुलूप तोडून चोरट्याने प्रवेश केला.
कपाट फोडून १७७.७ ग्रॅम (१७.७ तोळे) सोन्याचे दागिने आणि ₹ २३,०००/- रोख रक्कम चोरली. याप्रकरणी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दि. १२ फेब्रुवारी २०२५ रोजी, फराह रशीद शेख (वय ५१, व्यवसाय: शिक्षिका, रा. शाब्दी अपार्टमेंट, तेलंगी पाच्छा पेठ, सोलापूर) यांच्या बंद घराचे दिवसा कुलूप तोडून चोरट्याने घरात प्रवेश केला.
बेडरूममधील कपाट फोडून ३५.५ ग्रॅम (३.५ तोळे) सोन्याचे दागिने आणि ₹ १,००,०००/- रोख रक्कम लंपास केली. या प्रकरणी जेलरोड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हे भरदिवसा घडल्याने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.
सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने तांत्रिक विश्लेषण व परिसरातील बारकाईने निरीक्षण करून चोरी करणाऱ्या संशयिताचा माग काढला.
दि. १५ फेब्रुवारी २०२५ रोजी, गुप्त माहितीच्या आधारे तपास पथकाने संशयित अमन फैय्याज शेख (वय १९, रा. कसाईवाडा, कुर्ला वेस्ट, मुंबई, सध्या रा. नई जिंदगी, सोलापूर) यास अंत्रोळीकर नगर ते कुमठा नाका दरम्यान, क्रिडा संकुल रोडवरील पोस्ट ऑफिसजवळ सापळा रचून अटक केली. आरोपीकडून चोरी केलेला ऐवज जप्त करण्यात आला.
सदर कारवाई पोलीस आयुक्त एम. राज कुमार, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) डॉ. दीपाली काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) राजन माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (गुन्हे शाखा) सुनिल दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
तपास पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर, पोलीस अंमलदार संदीप जावळे, विनोद रजपूत, राजकुमार पवार, इम्रान जमादार, उमेश पवार, सिद्धाराम देशमुख, अजय गुंड, बाळासाहेब काळे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. सोलापूर गुन्हे शाखेच्या जलद आणि प्रभावी तपासामुळे घरफोडी प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात यश आले.
