१४ लाखांचा ऐवज हस्तगत : विश्रामबाग पोलिसांची कामगिरी
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : हातचलाखीने एटीएम कार्डची अदलाबदल करून २१ ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करणाऱ्या भामट्याला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली. या कारवाईत १६ गुन्हे उघडकीस आणून १३ लाख ९० हजार ७०० रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.
राजू प्रल्हाद कुलकर्णी (वय ५४, रा. नेताजीनगर, अलानहली, म्हैसूर, कर्नाटक) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडे १६६ एटीएम कार्ड सापडली असून, त्याने पुण्यात १६ गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे.
या गुन्ह्यांत एकूण १७ लाख ९२ हजार ७०० रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. त्यापैकी १३ लाख ९२ हजार ९०० रुपये हस्तगत करण्यात आले आहेत. राजू कुलकर्णी हा एटीएम सेंटरजवळ थांबून ज्येष्ठ नागरिकांना मदत करण्याच्या बहाण्याने त्यांच्या एटीएम कार्डचा पिन क्रमांक मिळवायचा.
नंतर त्यांचे कार्ड बदलून, दुसऱ्या एटीएम सेंटरमध्ये जाऊन खात्यातील रक्कम काढून घ्यायचा. २ फेब्रुवारी रोजी शास्त्री रोडवरील महाराष्ट्र बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये एका फिर्यादीचे कार्ड बदलून त्याच्या खात्यातून २२ हजार रुपये काढण्यात आले होते.
या प्रकरणाचा तपास करताना पोलीस अंमलदार मयुर भोसले आणि आशिष खरात यांनी तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे राजू कुलकर्णीला ताब्यात घेतले.त्याच्या चौकशीत पुण्यात १६ गुन्हे उघड झाले, ज्यात एकूण १७ लाख ९२ हजार ७०० रुपयांची फसवणूक झाली आहे.
यात विश्रामबागमधील (५ लाख ७९ हजार), सहकारनगरमधील (३ लाख ५५ हजार), कोथरुड (२ लाख ४५ हजार), सिंहगड रोड, बिबवेवाडी (प्रत्येकी १ लाख) शिवाजीनगर (८० हजार रुपये) यांचा समावेश आहे.
राजू कुलकर्णी मराठी समजत नसल्याचे भासवून चौकशी टाळत होता. त्यामुळे पोलिसांनी कन्नड भाषिक व्यक्तींची मदत घेऊन त्याच्याकडून अधिक माहिती मिळवली. त्याने इतर शहरांमध्येही गुन्हे केले असण्याची शक्यता असल्याने तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल, सहाय्यक पोलीस आयुक्त साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अरुण घोडके, पोलीस उपनिरीक्षक मनोज बरुरे आणि पोलीस अंमलदार अशोक माने, मयुर भोसले, सचिन कदम, गणेश कोठे, आशिष खरात, अर्जुन थोरात, राहुल मोरे, शिवा गायकवाड, संतोष शेरखाने, नितीन बाबर, सागर मोरे यांनी केली.
