माजी सैनिकाला गंडा घालण्याची घटना : लोहगाव-संतनगर रोडवर भरदिवसा चोरी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या माजी सैनिकाला अडवून, पोलीस असल्याचा बनाव करत दोन व्यक्तींनी त्याला लायसन्स दाखवण्यास सांगितले. सध्या चोऱ्या वाढल्या आहेत, दागिने काढून ठेवा, असे सांगत त्यांनी विश्वास संपादन केला. डिक्कीत ठेवलेले दागिने पाहण्याच्या बहाण्याने हातचलाखी करत ७५ हजार रुपयांची सोनसाखळी आणि अंगठी लंपास केली.
या प्रकरणी ६० वर्षीय सेवानिवृत्त सैनिकाने विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, त्यानुसार दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना संतनगर, लोहगाव-वाघोली रोडवरील इंडियन ऑईल पेट्रोल पंपासमोर सोमवारी सकाळी १० वाजता घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी डिसेंबर २०२१ मध्ये हवाई दलातून सेवानिवृत्त होऊन पुण्यात स्थायिक झाले आहेत. सोमवारी सकाळी ते नाश्ता आणण्यासाठी दुचाकीवरून लोहगाव-वाघोली रोडने जात असताना, इंडियन ऑईल पेट्रोल पंपासमोर दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांना अडवले.
त्यांनी पोलीस असल्याचे सांगत लायसन्स मागितले. त्यावर फिर्यादींनी नाश्ता आणण्यासाठी बाहेर पडलो असून, वाटल्यास लायसन्स आणून दाखवतो, असे सांगितले. त्यावर त्यांनी, “इतके सोने घालून फिरता, चोऱ्या किती वाढल्या आहेत, हे माहित नाही का?” असे सांगून अंगावरील सोनसाखळी आणि अंगठी काढून ठेवण्यास सांगितले.
फिर्यादींनी त्याप्रमाणे सोनसाखळी व अंगठी दुचाकीच्या डिक्कीत ठेवली. त्यानंतर एका चोरट्याने “दागिने व्यवस्थित ठेवलेत ना?” असे विचारून डिक्की उघडायला लावली. दुसऱ्याने त्यांना संभाषणात गुंतवले, आणि पहिल्याने हातचलाखी करत दागिने चोरून डिक्की बंद केली.
त्यानंतर दोघे विमाननगरकडे जाणाऱ्या रोडने दुचाकीवरून पसार झाले. फिर्यादींनी डिक्की उघडून पाहिले असता, सोनसाखळी आणि अंगठी गायब असल्याचे लक्षात आले. पोलीस उपनिरीक्षक नवनाथ क्षीरसागर पुढील तपास करत आहेत.
