वाहनांच्या उच्च सुरक्षा पाट्यांचे राज्यात जादा दर : कमी करण्याची मागणी
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : २०१९ पूर्वी खरेदी केलेल्या जुन्या वाहनांना अत्याधुनिक अशी उच्च सुरक्षा पाटी (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट) ३० एप्रिल पूर्वी बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी राज्य सरकारकडून तीन कंपन्यांना वाढीव दराने टेंडर देण्यात आले आहे. त्यामुळे इतर राज्यांतील दर आणि महाराष्ट्रातील दर यामध्ये मोठी तफावत आहे. हे दर कमी करावेत आणि राज्यातील वाहनमालकांची ही लुट थांबवावी, अशी मागणी काँग्रेस व राष्ट्रवादी काँगे्रस (शरद पवार) यांनी केली आहे.
हाय सिक्युरिटी नंबर प्लेट वाहनांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी तयार करण्यात आल्या आहेत. २०१९ पूर्वीच्या जुन्या वाहनांना देखील परिवहन विभागाने उच्च सुरक्षा पाटी बंधनकारक केले आहे.
ज्या कंपन्यांकडून हे नंबर प्लेट बसविण्यात येणार आहे. त्यांना वाढीव दराने टेंडर दिल्याने त्याचा फटका वाहनधारकांना बसत आहे. महाराष्ट्रात उच्च सुरक्षा नोंदणीकृत पाट्या (एचएसआरपी) बसविण्यासाठी आकारलेले शुल्क इतर राज्यांतील शुल्कांच्या तुलनेत दुप्पट, तिप्पट आहे.
महाराष्ट्रात दुचाकीसाठी ४५० रुपये शुल्क आहे. हाच दर आंध्र प्रदेशात २४५, गुजरातमध्ये १६० रुपये आहे. चारचाकीसाठी महाराष्ट्रात ७४५ रुपये असून आंध्र प्रदेशात ६१९, गुजरातमध्ये ४६० रुपये, गोव्यात २०३ रुपये आहे.
रिक्षासाठी महाराष्ट्रात ५०० रुपये तर, आंध्र प्रदेशात २८२ रुपये आकारले जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील वाहनधारकांची लुट केली जात असल्याने हे दर कमी करावेत, अशी मागणी होत आहे.
