प्रेमसंबंधानंतर लग्नास नकार देणार्या तरुणीविरोधात गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : दोघे शेजारी राहणारे, एकमेकांचे ४ वर्षांपासून प्रेमसंबंधातून तिने लग्नाचे आमिष दाखवून सतत पैशांची मागणी केली. त्यानंतर लग्नास नकार दिल्याने तरुणाने रेल्वेखाली उडी मारुन आत्महत्या केली. वानवडी पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल तरुणीवर गुन्हा दाखल केला आहे.
गणेश राजु सिंग (वय ३०, रा. गोसावी वस्ती, वैदवाडी, हडपसर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत गणेश यांची बहिण गौरी कांबळे यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यावरुन पोलिसांनी २६ वर्षाच्या तरुणीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश सिंग हा गोसावी वस्तीत रहायला असून त्यांच्या शेजारी राहणारी तरुणी यांच्यात गेल्या ४ वर्षांपासून प्रेम संबंध होते.
दोघांनी सर्वांना लग्न करणार असल्याचे म्हणत होते. गणेश हा शेवाळवाडी येथे लक्झरी बस थांबा येथे पाणी बॉटल विक्रीचे काम करत होता़. या तरुणीने गणेश याला लग्नाचे आमिष दाखवून त्याच्याकडून सतत पैसे घेत असत.
तिला कपडे खरेदी करुन देणे, रोज सकाळी जीमला नेऊन सोडणे, घरातील किराणा मालाचे पैसे देणे, हॉटेलला तसेच पिक्चरला घेऊन जाणे, तिच्या मोबाईलचा रिचार्ज मारुन देणे असे सर्व खर्च गणेश करीत होता.
तिने दुचाकी घेतली. त्याचे हप्तेही गणेश भरत होता. ७ फेब्रुवारी रोजी गणेश हा घरात एकटाच रडत बसला होता. तेव्हा त्याच्या बहिणीने कारण विचारल्यावर त्याने तिने मला धोका दिला. तिच्यासाठी खर्च करुन कर्जबाजारी झालो.
आता तिने माझा फोन ब्लॉक करुन ठेवला आहे, असे सांगून रडत बसला होता. त्यानंतर तो घरातून निघून गेला. नातेवाईकांनी त्याच्या हरविल्याची तक्रार दिली होती. १० फेब्रुवारी रोजी रामटेकडी रेल्वे मार्गावर एक मृतदेह सापडला. त्याच्या कपड्यावरुन त्यांनी ती गणेश याची असल्याचे ओळखले. पोलीस उपनिरीक्षक अविनाश शिंदे तपास करीत आहेत.
