हैदराबादच्या कंपनीची फसवणूक : पुण्यात व्यावसायिकावर गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे: हैदराबाद येथील एका बांधकाम व्यावसायिक कंपनीला १५ कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करून देतो, असे सांगून प्रोसेसिंगच्या नावाखाली ८ लाख ४८ हजार रुपये घेत कंपनीची फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यातील एका व्यावसायिकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत प्रकाश बाबू गुरुनाथराव अश्रीथ (वय ६५, रा. हैदराबाद) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी जयेश नटवरलाल शहा (रा. लुल्लानगर, कोंढवा) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार मे २०२३ ते ३ ऑक्टोबर २०२३ दरम्यान घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादींची हैदराबाद येथे ए.आर.डी. इस्टेट अँड प्रोजेक्ट प्रा. लि. ही कंपनी आहे, ज्यामध्ये फिर्यादी व्यवस्थापकीय संचालक आहेत. त्यांची मैसूर, बंगळुरू, हैदराबाद आणि चेन्नई येथे बांधकाम प्रकल्प सुरू आहेत. चेन्नई येथील प्रकल्पासाठी कंपनीला १५ कोटी रुपयांची गरज होती, त्यामुळे कर्ज घेण्याची त्यांची योजना होती.
फिर्यादींच्या एका मित्राने सांगितले की, त्याच्या ओळखीचे जयेश नटवरलाल शहा यांची दत्तकृपा कॉर्पोरेशन ही फायनान्स कन्सल्टंट कंपनी पुण्यातील लुल्लानगर येथे आहे. त्यांच्या एनआरआय फंड्समार्फत कर्ज मिळू शकते, असे त्याने फिर्यादींना सांगितले. त्यानुसार, मे २०२३ मध्ये जयेश शहा आणि अनिलकुमार हे दोघे मद्रासमधील अण्णानगर येथील प्रकल्पस्थळी येणार असल्याचे कळवण्यात आले.
फिर्यादींनी त्यांची विमानतिकिटे काढून दिली. तसेच, त्या ठिकाणी येण्यासाठी लागणारी प्रोसेसिंग फी म्हणून ४८ हजार रुपये जयेश शहा यांच्या दत्तकृपा कॉर्पोरेशनच्या खात्यावर पाठवले. जयेश शहा यांनी प्रकल्पस्थळी भेट देऊन, वर्किंग कॅपिटल अगेन्स्ट मॉर्गेज लोन मिळेल, तसेच संपूर्ण कर्जावर १ टक्के कमिशन द्यावे लागेल, असे पत्राद्वारे कळवले.
ही अट मान्य करून फिर्यादींनी कर्ज प्रक्रियेचा पाठपुरावा सुरू ठेवला. वेळोवेळी २ लाख रुपये अशा हप्त्यांत ८ लाख ४८ हजार रुपये दत्तकृपा कॉर्पोरेशनच्या खात्यावर पाठवण्यात आले. मात्र, नंतरही कर्ज प्रक्रिया सुरू झाली नाही.
यामुळे फिर्यादी स्वतः पुण्यात जयेश शहा यांच्या कार्यालयात आले. त्यांनी कर्जाची प्रक्रिया होत नसेल, तर आम्ही दिलेली रक्कम परत करा, असे सांगितले. मात्र, जयेश शहा यांनी ना कर्ज मंजूर केले, ना घेतलेली रक्कम परत केली. त्यामुळे शेवटी त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक किसन राठोड करत आहेत.
