मुलीच्या शिक्षणासाठी घेतले होते कर्ज, २४ हप्ते नियमित भरले, दोघा बाऊन्सरांना अटक
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : मुलीच्या शिक्षणासाठी घेतलेल्या कर्जाचे २४ हप्ते व्यवस्थित भरले. मात्र, भाच्याचा अपघात झाल्याने त्याच्या औषधोपचारासाठी खर्च झाल्यामुळे एक हप्ता भरता आला नाही. केवळ १८ हजार रुपयांचा एक हप्ता थकल्याच्या कारणावरून कंपनीच्या मॅनेजरने घरी बाऊन्सर (रिकव्हरी कर्मचारी) पाठवले. या बाऊन्सरांनी बेकायदेशीरपणे घरात शिरून दोघांना मारहाण केली. वानवडी पोलिसांनी या दोघा बाऊन्सरांना अटक केली आहे.
आकाश पुरुषोत्तम सापा (वय ३२, रा. भवानी पेठ) आणि ऋषिकेश नागनाथ चंदनशिवे (वय २६, रा. जनता वसाहत, पर्वती) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. बजाज फायनान्स कंपनीच्या मॅनेजर हर्षद जिमन याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी वानवडीतील शांतीनगरमध्ये राहणाऱ्या ४६ वर्षीय नागरिकाने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार फिर्यादीच्या शांतीनगरमधील घरात २७ मार्च रोजी सायंकाळी साडेसहा वाजता घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बँकेतून कर्ज काढण्यासाठी मदत करण्याचा व्यवसाय करतात. त्यांनी वाकडेवाडी येथील बजाज फायनान्समधून मुलीच्या शिक्षणासाठी ७ लाख ७३ हजार रुपयांचे कर्ज घेतले. त्यातील ४३ हजार रुपये विम्यासाठी कपात करण्यात आले.
प्रक्रिया शुल्क आणि इतर कपातीनंतर त्यांच्या खात्यात ६ लाख ८५ हजार रुपये जमा झाले. त्यांना १८,०७० रुपयांचा मासिक हप्ता ठरवण्यात आला होता. त्यांनी २४ हप्ते नियमितपणे भरले. दरम्यान, त्यांच्या १७ वर्षीय भाच्याचा अपघात झाला. त्याच्या उपचारासाठी आर्थिक मदत केल्याने त्यांना २ मार्चचा हप्ता भरता आला नाही.
यामुळे २५ मार्चपासून त्यांना फोनवरून शिवीगाळ आणि धमक्या मिळू लागल्या. त्यांनी स्वतः २६ मार्च रोजी बजाज फायनान्सच्या वाकडेवाडी कार्यालयात जाऊन हप्ता भरण्यास विलंब होण्यामागील कारण स्पष्ट केले. तेव्हा तेथील रिकव्हरी मॅनेजर जोशी यांनी त्यांना ४–५ दिवसांत हप्ता भरण्यास सांगितले.
तथापि, दुसऱ्याच दिवशी, २७ मार्च रोजी सायंकाळी फिर्यादी व त्यांचा भाऊ घरात असताना, दोन व्यक्ती त्यांच्या घरी आल्या. त्यांनी “आम्ही बजाज फायनान्सकडून आलो आहोत,” असे सांगितले. फिर्यादींनी त्यांच्याकडे ओळखपत्र मागितल्यावर त्यांनी उद्धटपणे, “तू कोण आम्हाला विचारणारा?” असे म्हटले.
फिर्यादींनी त्यांना जोशी साहेबांशी बोलणे झाले असल्याचे सांगितले आणि तीन–चार दिवसांत हप्ता भरणार असल्याचे स्पष्ट केले. यावर बाऊन्सरांनी, “हप्ता भरता येत नसेल तर कर्ज कशाला घेतले?” असे म्हणत शिवीगाळ केली आणि फिर्यादी व त्यांच्या भावाला मारहाण केली. त्यानंतर, फिर्यादींनी त्यांना घराबाहेर जाण्यास सांगितले.
मात्र, आरोपींनी “हप्ता घेतल्याशिवाय जाणार नाही,” असे सांगून घरातच बसून राहिले. शेवटी, फिर्यादींनी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केला. पोलिसांनी घटनास्थळी येऊन दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी मॅनेजर हर्षद जिमनच्या सांगण्यावरून ते घरी आल्याचे कबूल केले.
पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल करून दोघा बाऊन्सरांना अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस फौजदार साबळे करत आहेत.
