हडपसर पोलिसांची कामगिरी, २ जबरी चोरी उघडकीस, ३ दुचाकी जप्त
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : रस्त्यावरून मोबाईलवर बोलत जाणाऱ्या नागरिकांच्या हातातील मोबाईल जबरदस्तीने चोरून नेणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी पकडून त्याच्याकडून तब्बल ३८ मोबाईल हस्तगत केले आहेत. तसेच, त्याच्याकडून २ जबरी चोरीच्या घटनांची उकल करण्यात आली असून ३ दुचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत.
विकास ऊर्फ आकाश सुरेश वाघीरे (वय २१, रा. मेट्रो स्टेशन, दळवी हॉस्पिटलजवळ, शिवाजीनगर) असे या चोरट्याचे नाव असून त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आले आहे. या चोरट्याने प्रामुख्याने शिवाजीनगर, मुंढवा, हडपसर आणि लोणी काळभोर परिसरातून मोबाईल चोरी केल्याचे सांगितले आहे.
हडपसर भाजी मंडईत रिक्षाची वाट पाहत असताना, दोघा तरुणांनी मोटारसायकलवरून येऊन फिर्यादीच्या हातातून मोबाईल चोरून नेला होता. २४ मार्च रोजी पहाटे अडीच वाजता घडलेल्या या गुन्ह्याचा तपास करत असताना, तपास पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी विकास वाघीरे याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने चोरी केलेला मोबाईल आणि गुन्हा करण्यासाठी वापरलेली दुचाकी पोलिसांनी जप्त केली.
अधिक चौकशीत, त्याने चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतही अशाच प्रकारचा गुन्हा केल्याचे आढळून आले. आरोपी चोरीच्या दुचाकीचा वापर करून गुन्हे करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्याकडून हडपसर, लोणी काळभोर आणि खडकी पोलीस ठाण्यातील तीन गुन्हे उघडकीस आले आहेत.
आरोपीकडून ३८ मोबाईल हस्तगत करण्यात आले असून त्याचा तपास सुरू आहे. ३८ मोबाईल आणि ३ दुचाकी असा एकूण ५ लाख २० हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे करत आहेत.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, पोलीस निरीक्षक (गुन्हे) निलेश जगदाळे यांच्या सूचनेप्रमाणे करण्यात आली.
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड, पोलीस अंमलदार अविनाश गोसावी, दीपक कांबळे, निलेश किरवे, चंद्रकांत रेजितवाड, अजित मदने, अमोल दणके, कुंडलिक केसकर, अमित साखरे, अभिजित राऊत, तुकाराम झुंजार, महावीर लोंढे, महेश चव्हाण आणि बापू लोणकर यांनी सहभाग घेतला.
