लष्कर पोलिसांनी तरुणाविरुद्ध केला गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : मुलाला एमआयटीच्या लोणी येथील कॉलेजमध्ये एमबीएसाठी प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका भामट्याने अडीच लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोंढवा येथील ४६ वर्षीय नागरिकाने याबाबत लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, त्यावरून यासीन इस्माईल शेख (वय ३९, रा. युनिटी कॉम्प्लेक्स, होली एंजेल चर्चजवळ, रास्ता पेठ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार आझम कॅम्पसच्या परिसरात ८ ते २० ऑगस्ट २०२४ या कालावधीत घडला.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व यासीन शेख यांची ओळख आझम कॅम्पस परिसरात झाली. यासीन शेख याने फिर्यादी यांना त्यांच्या मुलाला एमआयटी लोणी येथे एमबीएच्या प्रवेशासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी त्याने अडीच लाख रुपये घेतले. मात्र, हे पैसे कॉलेजमध्ये न भरता स्वतःसाठी वापरले.
फसवणुकीचा प्रकार लक्षात आल्यानंतर फिर्यादीने यासीनकडे पैसे परत मागितले. मात्र, त्याने वेळकाढूपणा केला आणि पैसे परत दिले नाहीत. अखेर फिर्यादीने लष्कर पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल घाडगे करीत आहेत.
