अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई : महागड्या स्पोर्ट्स बाईकवरून तस्करी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : महागड्या स्पोर्ट्स बाईकवरून अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या तरुणाला संशयावरून अंमली पदार्थ विरोधी पथकाने पकडले. या तरुणाच्या अंगझडतीमध्ये १० लाख ६० हजार रुपयांचा मॅफेड्रोन (एम. डी.) आढळून आला.
बजरंगलाल भगवानराम खिल्लेरी (वय २१, रा. जाधववाडी, मोशी, मूळ रा. राजस्थान) असे या अंमली पदार्थ तस्कराचे नाव आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक आणि त्यांचे सहकारी खडकी परिसरात पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार युवराज कांबळे यांना गोपनीय माहिती मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी बजरंगलाल खिल्लेरी याला पकडले. त्याच्या अंगझडतीत १० लाख ६० हजार रुपयांचे ५३ ग्रॅम मॅफेड्रोन (एम. डी.) हा अंमली पदार्थ, १ लाख ८० हजार रुपयांची महागडी यामाहा स्पोर्ट्स बाईक, इतर ऐवज असा एकूण १२ लाख ९० हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, पोलीस अंमलदार युवराज कांबळे, पोलीस हवालदार रोकडे, शेख, राक्षे, पोलीस अंमलदार शेख, पाटील, दिनेश बास्टेवाड यांनी केली आहे.
