वारजे येथील गणपती माथा कार्यालयाबाहेरील मध्यरात्रीची घटना
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : शिवसेना शिंदे गटाचे युवासेना जिल्हा प्रमुख निलेश घारे यांना रेकॉर्डवरील गुन्हेगाराने धमकी देणारा फोन सोमवारी सायंकाळी केला. याची तक्रार त्यांनी वारजे पोलिसांकडे केली. त्यानंतर काही वेळातच मध्यरात्रीच्या सुमारास कार्यालयाबाहेर पार्क केलेल्या त्यांच्या गाडीवर गोळीबार झाला. दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी एकाने गोळीबार केला. ही घटना गणपती माथा येथील निलेश घारे यांच्या कार्यालयाबाहेर रात्री साडेअकरा वाजता घडली.
शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर निलेश घारे यांनी एकनाथ शिंदे यांना साथ देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांची शिवसेनेच्या युवासेनेच्या जिल्हाप्रमुखपदी निवड झाली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलेश घारे हे आपल्या जनसंपर्क कार्यालयात कार्यकर्त्यांसमवेत बसले होते.
कार्यालयाबाहेर कार पार्क केली होती. दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी एकाने त्यांच्या काळ्या रंगाच्या क्रेटा कारवर गोळीबार केला. त्यातील एक गोळी कारच्या काचेला लागली. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
सीसीटीव्हीमध्ये दोघेजण दुचाकीवरून येताना दिसतात. त्यातील एकाने आपल्या जवळील पिस्तुलातून गोळी झाडलेली दिसते. निलेश घारे यांना वारजे माळवाडी भागातील एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराने कालच धमकी दिली होती.
या धमकीच्या फोनबाबत घारे यांनी वारजे माळवाडी पोलिसांना माहिती दिली होती. त्यानंतर काही वेळातच गोळीबाराची घटना घडली. रेकॉर्डवरील गुन्हेगार फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
याबाबत पोलीस उपायुक्त संभाजी कदम म्हणाले की, निलेश घारे यांना सोमवारी सायंकाळी एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराने धमकी दिली होती. तशी तक्रार त्यांनी वारजे पोलिसांकडे केली आहे.
त्यानंतर ते रात्री कार्यालयात असताना त्यांच्या गाडीवर गोळीबार झाला. एक गोळी कारच्या काचेला लागली आहे. काही वर्षांपासून निलेश घारे यांनी आपल्या जिवाला धोका असल्याने पोलीस संरक्षण मिळावे, असा अर्ज पुणे पोलिसांकडे केला होता, असेही पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी सांगितले.
