हडपसर पोलिसांनी दोन दिवस रात्र एक करून मिळवला नेकलेस परत
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : सोन्याचा साडेतीन तोळ्यांचा नेकलेस गहाण ठेवून पैसे घेऊन त्यातून आर्थिक अडचणी भागवायचा असा त्यांचा विचार होता. त्यासाठी ते घरातून निघाले खरे, पण हडपसरमधील सराफ कट्टा येथे येईपर्यंत त्यांचा विचार बदलला. दागिना गहाण न ठेवताच ते परत घरी आले. घरी आल्यावर पॅन्टच्या खिशात त्यांना तो सोन्याचा नेकलेस मिळाला नाही. त्यांनी हडपसर पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी दोन दिवस रात्र एक करून सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यानंतर तो नेकलेस परत मिळवून देण्यात पोलिसांना यश आले.
हडपसरमधील सराफ कट्टा येथे ८ ऑगस्ट रोजी ही घटना घडली होती. सोन्याचा नेकलेस गहाळ झाल्याचे समजल्यावर हडपसर पोलिसांनी हडपसरमधील सराफ कट्टा ते तक्रारदार यांच्या घरापर्यंतच्या वाटेतील सर्व सीसीटीव्हींचे फुटेज मागवून तपासले.
९ व १० ऑगस्ट या दोन दिवसांमध्ये सर्व सीसीटीव्ही फुटेजचा धांडोळा घेतल्यानंतर हा नेकलेस एका व्यक्तीला सापडल्याचे दिसून आले. पोलिसांनी या व्यक्तीचा शोध घेऊन त्याच्याकडून हा नेकलेस मिळविला. त्यानंतर पोलीस निरीक्षक (गुन्हे) निलेश जगदाळे यांच्या हस्ते या तक्रारदाराला त्याचा नेकलेस परत करण्यात आला.
ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, पोलीस निरीक्षक (गुन्हे) निलेश जगदाळे, अश्विनी जगताप यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड, पोलीस अंमलदार अमित साखरे, महावीर लोंढे यांनी केली आहे.
