चंदननगरमधील आंबेडकर वसाहतीतील घटना, दोघांना अटक
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हणून तिचा विनयभंग केल्याच्या रागातून दोघांनी तरुणाला लाथाबुक्क्यांनी आणि हॉकी स्टीकने मारहाण करून त्याचा खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
साईनाथ उर्फ खलीबली दत्तात्रय जानराव (वय ३५, रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत, चंदननगर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी सोन्या उर्फ आदित्य संतोष वाल्हेकर (वय २१) आणि समर्थ उर्फ करण पप्पू शर्मा (वय २१, दोघे रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत, चंदननगर) यांना अटक करण्यात आली. याबाबत पोलीस हवालदार राहुल गिरमे यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना चंदननगरमधील आंबेडकर वसाहतीत मंगळवारी, १२ ऑगस्ट रोजी रात्री साडेआठ ते दहा दरम्यान घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदननगर भागातील डॉ. आंबेडकर वसाहतीत साईनाथ जानराव आणि आरोपी राहतात. साईनाथ जानराव याने ११ ऑगस्ट रोजी आरोपींच्या चुलतीची छेड काढली आणि तिला ‘आय लव्ह यू’ असे म्हटले होते. हे त्यांना समजल्यावर १२ ऑगस्ट रोजी रात्री साडेआठच्या सुमारास वाल्हेकर आणि शर्मा यांनी जानराव याला जाब विचारला. यावरून साईनाथ जानराव आणि आरोपींमध्ये वाद झाला. तेव्हा दोघांनी जानराव याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. हॉकी स्टीकने जबर मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, सहायक पोलीस आयुक्त प्रांजल सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी दोघांना अटक केली असून, सहायक पोलीस निरीक्षक विकास बाबर तपास करीत आहेत.
















