सहकारनगर पोलिसांची कामगिरी: भामट्याविरुद्ध यापूर्वी ६ गुन्हे दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : पोलीस असल्याची बतावणी करून “पोलीस ठाण्यात चल” असे म्हणून कारमधून कामगाराचे अपहरण करून त्याला मारहाण करून लुबाडणाऱ्या दोघा चोरट्यांना सहकारनगर पोलिसांनी जेरबंद केले आहे.
श्रीकांत लक्ष्मण डोईफोडे (वय ३९, रा. चव्हाणनगर, धनकवडी, मूळ रा. शिरूर घाट, ता. केज, जि. बीड) आणि नेहा उर्फ शितल दिनेश पवार (वय ३७, रा. चव्हाणनगर, धनकवडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट कार, ३ मोबाईल असा २ लाख ९५ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. श्रीकांत डोईफोडे याच्यावर भारती विद्यापीठ व बिबवेवाडी पोलीस ठाण्यात एकूण ६ गुन्हे दाखल आहेत.
शंकर महाराज मठाच्या समोर ‘ईशा लॉज’ आहे. तेथे २७ ऑगस्ट रोजी पहाटे सव्वा पाच वाजता एक महिला व एक पुरुष आले. त्यांनी तेथील कामगाराला “आम्ही पोलीस आहोत, लॉज चेक करायचा आहे” असे सांगितले.
त्यांनी रिसेप्शन काऊंटरवरील रजिस्टर तपासले व “तु आमच्यासोबत पोलीस ठाण्यात चल” असे म्हणून कामगाराला स्विफ्ट कारमध्ये बसवून स्वारगेटच्या दिशेने नेले. वाटेत त्याला हाताने मारहाण करून मोबाईलमधील गुगल पे द्वारे ६ हजार रुपये ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. त्यानंतर कामगाराला स्वारगेटजवळ सोडून ते पळून गेले होते.
या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक सद्दाम हुसेन फकीर, पोलीस अंमलदार करीत असताना पोलीस अंमलदार चंद्रकांत जाधव व सागर सुतकर यांना बातमीदारांकडून माहिती मिळाली की हा गुन्हा श्रीकांत डोईफोडे व नेहा पवार यांनी केला आहे. त्यानुसार पोलिसांनी त्यांचा शोध घेऊन दोघांना पकडले.
श्रीकांत डोईफोडे याच्यावर भारती विद्यापीठ व बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचे एकूण ६ गुन्हे दाखल आहेत. त्याने अशा प्रकारे कोणाची फसवणूक केली असेल तर सहकारनगर पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार यांनी केले आहे.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुरेखा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सद्दाम हुसेन फकीर, पोलीस अंमलदार चंद्रकांत जाधव, सागर सुतकर, निलेश शिवतारे, संदीप कोळगे, अभिमान बागलाणे, रफीक तडवी, जयश्री शेळके, पूजा तिडके यांनी केली आहे.















