मार्केटयार्ड परिसरात गणेशोत्सवातील गर्दीचा फायदा घेऊन केली चोरी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : गणेशोत्सवातील गर्दीचा गैरफायदा घेऊन मार्केटयार्ड परिसरात मोबाईल चोरी करणाऱ्या अल्पवयीन मुलाला मार्केटयार्ड पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून वेगवेगळ्या कंपनीचे १३ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
पोलीस उपनिरीक्षक सुनील भापकर आणि पोलीस अंमलदार हे मार्केटयार्ड येथील आंबेडकरनगर, बैल बाजार येथे पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार कौस्तुभ जाधव आणि थोरात यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एक जण स्वप्नपूर्ती सोसायटीच्या समोरील पार्किंगच्या भिंतीलगत हातात पिशवी घेऊन थांबला आहे.
तो चोरीचे मोबाईल विक्री करण्यासाठी आला असल्याचे बातमीदाराने सांगितले. यानंतर पोलीस पथक स्वप्नपूर्ती सोसायटीकडे गेले. तेथे आडोशाला एक जण पिशवी घेऊन थांबलेला दिसला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली.
त्यावेळी तो अल्पवयीन असल्याचे लक्षात आले. त्याच्याकडील पिशवीची झडती घेतली असता त्यात १३ मोबाईल आढळून आले. पोलिसांनी ते जप्त केले. अधिक चौकशीत त्याने हमालनगर, मार्केटयार्ड परिसरातून हे मोबाईल चोरल्याचे सांगितले. पोलिसांनी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीषा पाटील यांच्या आदेशाने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनीता नवले, पोलीस उपनिरीक्षक सुनील भापकर, थोरात, कौस्तुभ जाधव, राऊत, झेंडे, जेधे, किरण जाधव आणि आशिष यादव यांनी केली आहे.
