रिक्षाचालकासह चौघांवर गुन्हा दाखल : पुणे-सोलापूर रोडवरील कदमवाक वस्तीतील भरदिवसाची घटना
पुणे : शेअर रिक्षाने जात असताना वाटेत रिक्षाचालक आणि त्याचे तीन साथीदार यांनी सुरक्षा रक्षकाला मारहाण करून त्याच्याकडील रोख रक्कम व मोबाईल जबरदस्तीने चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत नामदेव विकास पवार (वय २३, रा. कदमवाक वस्ती) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून पोलिसांनी चौघांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार पुणे-सोलापूर रोडवरील कदमवाक वस्ती येथील श्री दत्त मिसळ हॉटेलसमोरील रस्त्यावर ७ सप्टेंबर रोजी दुपारी साडेचार वाजता घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे मूळचे धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील रहिवासी आहेत. ते कदमवाक वस्ती येथील फिल्ड गार्ड फिल्टर कंपनीत गेल्या १० महिन्यांपासून सुरक्षा रक्षक म्हणून काम करत आहेत.
७ सप्टेंबर रोजी ते फुरसुंगी फाटा येथील गुजराती लोकांच्या कार्यक्रमासाठी सुरक्षा रक्षक म्हणून गेले होते. सायंकाळी चार वाजता काम संपल्यानंतर ते सोलापूर रोडवर थांबले. आलेल्या रिक्षाला हात दाखवून थांबविले.
रिक्षात चालक व तीन जण होते. कदमवाक वस्ती आल्यावर त्यांनी रिक्षा थांबविण्यास सांगितले. ते रिक्षातून उतरून पैसे देत असताना, चालकाशेजारी बसलेला खाली उतरून त्यांचा हात पिरगळला. पॅन्टच्या खिशात ठेवलेला मोबाईल जबरदस्तीने काढून घेऊन तो पळून जाऊ लागला.
त्यांनी रिक्षा अडविण्याचा प्रयत्न केला, तेव्हा रिक्षात मागे बसलेल्या दोघांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यांच्या खिशातील पाकीट जबरदस्तीने काढून घेतले. पाकिटात आधार कार्ड, पॅनकार्ड, एटीएम कार्ड तसेच साडेतीन हजार रुपये होते.
चोरट्यांनी मोबाईलसह २१ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के करत आहेत.
