महिलेची फसवणूक : सहकारनगर पोलिसांची कारवाई
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : “मंत्रतंत्राच्या माध्यमातून पूजाअर्चा केल्यास तुला मुल होईल” असा विश्वास एका विवाहित महिलेला दाखवून तिच्याकडून तीन लाखांहून अधिक रक्कम आणि सोन्याचे दागिने घेणाऱ्या तथाकथित बाबाला सहकारनगर पोलिसांनी अटक केली आहे.
गिरिश बलभीम सुरवसे (वय ३६, रा. शास्त्री चौक, आळंदी रोड, भोसरी) असे या बाबाचे नाव आहे. त्याच्यासह एका साथीदारावर महाराष्ट्र नरबळी व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा प्रकार २८ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर दरम्यान बालाजीनगर परिसरात घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विवाहितेला मूल होत नसल्याने तिच्या ओळखीच्या एका व्यक्तीने सुरवसेची ओळख करून दिली.
“मंत्रतंत्राने तुला मूल होईल” असा विश्वास संपादन करून सुरवसेने वेळोवेळी एक लाख २० हजार रुपये घेतले. याशिवाय, तिला मंदिरात नेऊन मंत्रोच्चारासह अघोरी विधी केला. त्याचदरम्यान, फिर्यादीला कसल्यातरी अंगाऱ्याचे पेढ्यातून सेवन करण्यास सांगण्यात आले आणि तिच्याकडील सोन्याचे दागिनेही काढून घेण्यात आले.
एकूण ३ लाख १५ हजारांचा ऐवज घेऊन ही फसवणूक करण्यात आली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संबंधित महिलेनं सहकारनगर पोलिस ठाण्यात धाव घेतली. तक्रारीनंतर पोलिसांनी सुरवसेला अटक केली असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विशाल पवार करीत आहेत.
