आर टी ओ चलनाची एपीके फाईल पाठवून व्यावसायिकाला अडीच लाखांचा गंडा
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : “आरटीओ चलनाची एपीके फाईल” असा मेसेज आला तर सावध राहा! ही फसवणुकीची नवीन पद्धत असून, अशा फाईल्स ओपन केल्यास काही सेकंदांत तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते. कात्रजमधील एका व्यावसायिकाला अशाच प्रकारे अडीच लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे.
या प्रकरणी कात्रजमधील खोपडेनगर येथे राहणाऱ्या ४० वर्षीय व्यावसायिकाने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना गणेश विसर्जनाच्या दिवशी, म्हणजेच ६ सप्टेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजता घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादींना मोबाईलवर व्हॉट्सअॅपद्वारे “आरटीओ चलन” नावाची एपीके फाईल प्राप्त झाली. त्यांनी ती उघडल्यावर त्यांच्या वाहनावर ५०० रुपयांचा दंड असल्याचे दाखवले गेले. पुढे त्यांना “येथे क्लिक करा” असा संदेश आला. त्यांनी तो क्लिक केल्यानंतर मोबाईल घरात ठेवून ते गणपती विसर्जनासाठी कात्रज तलावावर गेले.
दुपारी चार वाजता घरी परतल्यानंतर त्यांनी पंजाब नॅशनल बँकेच्या खात्यातून १ लाख ८६ हजार १८१ रुपये काढले गेल्याचे लक्षात आले. तत्काळ त्यांनी उर्वरित रक्कम दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो अयशस्वी ठरला. पुढील चौकशीत त्यांच्या खात्यातून एकूण पाच व्यवहारांद्वारे २ लाख ५५ हजार ४३४ रुपये काढण्यात आल्याचे समोर आले.
फिर्यादींनी तत्काळ सायबर पोलिसांकडे आणि ऑनलाईन पोर्टलवर तक्रार नोंदवली असून, वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल खिलारे यांचा या प्रकरणी तपास सुरू आहे. सायबर पोलिसांकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, “कोणतीही एपीके फाईल किंवा अनोळखी लिंक व्हॉट्सअॅप किंवा इतर माध्यमातून आली, तर ती उघडू नका. अशा फाईल्सद्वारे फसवणूक करून तुमचे वैयक्तिक आणि बँकिंग माहिती चोरली जाऊ शकते.”

 
			


















