सहा महिन्यांत सुसज्ज वास्तू पूर्ण होणार : भूमिपूजनावेळी विजयराज बंब भावूक
महाराष्ट्र जैन वार्ता
बीड : दैनिक लोकाशाचे संपादक विजयराज बंब यांच्या संकल्पनेतून साकारत असलेल्या भव्य ‘बंब समरथ भवन’च्या भूमिपूजनाचा विधी गुरुवारी (दि. ११) शहरातील मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
येत्या सहा महिन्यांत ही अत्याधुनिक व सुसज्ज वास्तू पूर्ण होणार असल्याची माहिती यावेळी विजयराज बंब यांनी दिली. पुणे येथील प्रसिद्ध वास्तुविशारद कुशल टाटीया यांनी या भवनाचे आकर्षक व सुबक डिझाईन तयार केले आहे.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस लोकाशा टीव्हीचे संपादक रोशन बंब आणि त्यांच्या पत्नी प्रिया बंब यांच्या हस्ते विधीवत पूजा करण्यात आली. त्यानंतर प्रिया बंब व श्रुती बंब यांच्या नवकार मंत्र पठणाने मुख्य कार्यक्रमास प्रारंभ झाला. राजू पगारिया व अमोल पगारिया यांच्या भजनानंतर नवकार मंत्राचा सामूहिक जप करण्यात आला.
यावेळी बोलताना विजयराज बंब म्हणाले, “हा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा आणि भावनिक क्षण आहे. गेल्या चार-पाच वर्षांपासून मनात ही संकल्पना होती की, उपलब्ध असलेल्या या मोठ्या जागेत काही व्यावसायिक न करता समाजासाठी समरथ भवन, जैन स्थानक उभे करावे.
स्थानक भूमिपूजन म्हणजे माझ्या दृष्टीने चातुर्मासाची फलश्रुती आहे. चातुर्मासात महाराजसाहेबांच्या प्रवचनातून दानाचे महत्त्व समजले आणि त्यातूनच हा संकल्प दृढ झाला.” शहरात आधीच एक स्थानक असताना नव्या भवनाची गरज का भासली, याचे स्पष्टीकरण देताना ते म्हणाले, “सध्याच्या स्थानकात जागेची कमतरता, अरुंद रस्ता, अपुरी पार्किंग व्यवस्था आणि वाहतुकीचा प्रचंड आवाज अशा अडचणी येऊ लागल्या होत्या.
प्रवचन सुरू असताना अनेकदा आवाजामुळे प्रवचन थांबवावे लागत होते. त्यामुळे शांत, प्रशस्त आणि सुसज्ज समरथ भवन उभारण्याचा निर्णय घेतला.” पुणे येथील वास्तुविशारद कुशल टाटीया आणि बीड येथील अभियंता राहुल बोरा यांनी यावेळी समरथ भवनाची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली.
कार्यक्रमात सतीश छाजेड, किशोर पगारिया, अक्षय कोटेचा, प्रेमचंद लोढा यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन राजेंद्र मुनोत यांनी केले. शेवटी उपस्थित मान्यवरांनी सामूहिक कुदळ मारून भूमिपूजन विधी पूर्ण केला. कार्यक्रमास जैन समाजातील श्रावक-श्राविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
मी मालक नाही, वॉचमन आहे – विजयराज बंब म्हणाले, “हे भवन माझ्या नावाने असले तरी ते केवळ नावापुरते आहे. हे संपूर्ण जैन समाजाचे आहे. मी येथे कधीही मालक म्हणून वावरणार नाही; मी फक्त वॉचमनच्या भूमिकेत राहीन. समाजाने कोणताही संकोच न ठेवता येथे सर्व धार्मिक कार्यक्रम घ्यावेत, हीच माझी विनंती आहे.
आता हेच माझे घर – यावेळी भावूक होत ते म्हणाले, आता माझे संपूर्ण आयुष्य सेवेसाठी समर्पित करणार आहे. माझे घर आता हेच असेल. पुढील पिढीसाठी स्थानकाच्या शेजारी उभे राहणारे हे पुण्यकार्य ठरेल. येथे वर्षभर धर्मकार्य सुरू राहावे, हीच माझी मनापासूनची इच्छा आहे.
असे असेल ‘बंब समरथ भवन’ – वास्तुविशारद कुशल टाटीया यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे ९ हजार स्क्वेअर फूट क्षेत्रफळावर ६० बाय १५० फूट जागेत हे भव्य समरथ भवन उभारले जाणार आहे. एकूण चार मजल्यांची ही वास्तू असेल. ग्राऊंड फ्लोअरवर पार्किंग व स्वच्छतागृहांची व्यवस्था असेल. पहिल्या मजल्यावर सुमारे ५ हजार स्क्वेअर फूटाचा भव्य प्रवचन हॉल असेल. दुसऱ्या मजल्यावर धर्मआराधनेसाठी स्वतंत्र हॉलची व्यवस्था करण्यात आली आहे. तिसऱ्या मजल्यावर अतिथी भवन व स्वयंपाकघर असेल, तर चौथ्या मजल्यावर टेरेस उपलब्ध असेल. याशिवाय टू-व्हिलरसाठी ३०० स्क्वेअर फूट क्षेत्रात स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करण्यात येणार असून, भवनाच्या शेजारील ८ हजार स्क्वेअर फूट मोकळी जागा फोर-व्हिलर पार्किंगसाठी राखीव ठेवण्यात आली आहे.















